लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या. अर्थात असे असले तरी नाशिक जिल्ह्यात महायुतीकडून तीन जागांवर उमेदवार घोषित करणे बाकी आहे. यात नाशिक मध्यच्या जागेचा समावेश आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत फक्त उध्दवसेनेने पाच उमेदवार घोषित केले असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मिळून एकूण नऊ जागांवरील उमेदवारांचा घोळ सुरूच आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण १५ विधानसभा मतदारसंघ आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सहा, भाजपाचे पाच, शिवसेनेचे दोन आणि काँग्रेस तसेच एमआयएमचे एक असे पक्षीय बलाबल होते. राज्यात दोन ते अडीच वर्षांत झालेल्या फाटाफुटीमुळे यापूर्वी राष्ट्रवादीच्या ज्या जागा होत्या त्यातील सर्व आमदार अजित पवार गटात गेले तरी त्या जागा यंदा राष्ट्रवादी शरद पवार गट लढवणार असे ठरले होते. दरम्यान, नव्या समीकरणात अनेकांनी वेगवेगळ्या जागांवर दावे केले होते. मात्र, महाविकास आघाडीकडून आत्तापर्यंत केवळ उध्दवसेनेचे पाच उमेदवार जाहीर आहेत.
यात नाशिक मध्यमधून वसंत गिते, नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर, निफाडमधून माजी आमदार अनिल कदम, मालेगाव बाह्यमधून अद्वय हिरे आणि नांदगावमधून गणेश धात्रक यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. मात्र, उर्वरित जागांवर अद्याप उमेदवार घोषित नाही. राष्ट्रवादीकडे यापूर्वी कळवण, येवला, निफाड, देवळाली, सिन्नर आणि बागलाण हे सहा मतदारसंघ होते. मात्र, यात शरद पवार गटाकडून एकाही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. काँग्रेस पक्षाला इगतपुरी आणि मालेगाव मध्य अशा दोन जागा देण्यात आल्या होत्या.
त्यात या दोन जागांबरोबरच चांदवडच्या जागेची भर पडणार आहे. मात्र, त्याबाबतही निर्णय नाही. गेल्यावेळी शिवसेनेला फक्त दोन जागांवर यश मिळाले होते. यंदा त्यांना पाच जागांवर संधी मिळाली आहे. शिवाय देवळाली मतदारसंघदेखील मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने कळवण येथील जागा अगोदरच माकपाला दिली अशी चर्चा होती, अन्यथा ती जागादेखील राष्ट्रवादी लढवेल. सिन्नरला पालकमंत्री दादा भुसे यांचे निकटवर्तीय असलेले उदय सांगळे यांनी शरद पवार गटात प्रवेश करून तीन दिवस झाले तरी त्यांना उमेदवारी घोषित नाही. नाशिक पूर्वमध्ये घोळ कायम असून, तेथे बहुजन चेहरा की मराठा असा घोळ असल्याने तेथेही उमेदवार घोषित नाही. नाशिक पूर्व हा देखील उमेदवारीचा घोळ आहे. येवला, दिंडोरी, इगतपुरी, बागलाण, मालेगाव मध्य, चांदवड या जागांवर अद्याप उमेदवार घोषित नाही. त्यामुळे घोषणा कधी होणार याकडे लक्ष लागून आहे.
यांची झाली घोषणा
महायुतीने मात्र, बऱ्यापैकी जागावाटपच नव्हे तर उमेदवारदेखील घोषित केले आहेत. नाशिक शहरातील नाशिक पूर्व, आणि नाशिक पश्चिम तसेच ग्रामीणमध्ये चांदवड आणि बागलाणमध्ये हे उमेदवार घोषित केले. भाजपने केवळ नाशिक मध्यमध्ये उमेदवार घोषित केलेला नाही. शिंदेसेने पालकमंत्री दादा भुसे, सुहास कांदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने येवला येथे मंत्री छगन भुजबळ तसेच दिंडोरी, इगतपुरी देवळाली, सिन्नर, कळवण याप्रमाणे उमेदवार घोषित केले आहेत.