लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.२४) जिल्ह्यात एकूण २० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, दिवसभरात २९२ अर्जाची विक्री झाली आहे. गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर मंत्री छगन भुजबळ यांनी येवला-लासलगाव मतदारसंघातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला असून दिंडोरी-पेठ मतदारसंघातून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता अर्ज दाखल केला आहे.
चांदवड मतदारसंघातून माघार घेऊनही उमेदवारी जाहीर झालेले भाजपचे डॉ. राहुल आहेर यांनीही अर्ज दाखल केला आहे, तर छगन भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत खळबळ उडवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होतील अशी अटकळ बांधली जात होती. परंतु दिवसभरात विविध मतदारसंघातून केवळ २० अर्ज दाखल झाले आहेत. येवला-लासलगाव मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ, दिंडोरी-पेठमधून नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुशीला चारोस्कर, मालेगाव बाह्य मधून अद्वय हिरे, कळवणमधून आमदार नितीन पवार, चांदवडमधून आमदार डॉ. राहुल आहेर, सिन्नरमधून आमदार माणिकराव कोकाटे व उदय सांगळे, निफाडमधून आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
नांदगावमधून माजी खासदार समीर भुजबळ यांनी अखेर बंडखोरीचा पवित्रा घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीचेच आमदार सुहास कांदे यांना आव्हान दिले आहे. मालेगाव बाहामधून बंडूकाका बच्छाव, यशवंत खैरनार, कळवणमधून बेबीलाल पालवी, भाजपचे रमेश थोरात, दिंडोरीतून एकनाथ खराटे, संतोष रेहरे, सुनिता रामदास चारोस्कर, नाशिक मध्यमधून अक्षय जाधव, नाशिक पश्चिममधून दिलीपकुमार भामरे यांनी देखील अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, चांदवड-देवळा मतदारसंघातून माघार घेतलेले व नंतर उमेदवारी जाहीर झालेले आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पुन्हा येत्या सोमवारी (दि. २८) अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
गाजावाजा न करता झिरवाळांचा अर्ज
दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या दिवशी पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यात आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांनी अर्ज दाखल केला तर महायुतीतील शिंदेसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सुरेश डोखळे आदी नेते कार्यकर्त्याच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. महाले यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरल्याने दिंडोरी तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीत कोणतीही चर्चा न होता परस्पर उमेदवारी जाहीर केली असून आपण उमेदवारीवर ठाम असल्याचे धनराज महाले यांनी सांगितले. दरम्यान, झिरवाळ यांनी आपण महाले यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. झिरवाळ यांचा अर्ज दाखल करण्यास भाजप नेते चंद्रकांत राजे उपस्थित होते.