लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक/नाशिकरोड: मध्य नाशिकमध्ये महायुतीचा तर पूर्व नाशिक आणि देवळालीमध्ये महाविकास आघाडीचा घोळ सुरूच आहे. भाजपची पहिली यादी घोषित होऊन तीन दिवस झाले तरी अद्यापही भाजपने मध्य नाशिकमध्ये उमेदवार घोषित केलेला नाही. दरम्यान, देवळाली मतदारसंघ आपल्याकडे मिळविण्यासाठी महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व उद्धव सेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा व देवळालीच्या जागेवरून राष्ट्रवादी व शिवसेनेत पेच निर्माण झाल्याने अद्याप निर्णय झाला नसला तरी देवळालीची जागा उद्धवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे.
नाशिक पूर्व मतदारसंघातही राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार घोषित केला नसून जिल्ह्यातील काही जागांमुळे हा निर्णय प्रलंबित असल्याचे कळते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गुरुवारी (दि. २४) झालेल्या पहिल्या यादीत नाशिकमधील एकाही उमेदवाराचे नाव घोषित झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिकमध्ये अद्यापही सर्व पक्षांचे उमेदवार घोषित झालेले नाहीत. भाजपाने पहिल्या यादीत आमदार देवयानी फरांदे यांची उमेदवारी घोषित केली नाही. दुसऱ्या यादीत त्यांचे नाव येईल, असे सांगण्यात येत असले तरी अद्याप निर्णय झालेला नाही. देवळाली मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे यांनी उद्धवसेनेच्या माजी आमदार योगेश घोलप यांचा पराभव केला होता. मात्र, त्या राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्याने देवळालीतील महाविकास आघाडीची जागा राष्ट्रवादी शरद पवार गट लढवणार असल्याने उमेदवारांची दावेदारी सुरू होती. योगेश घोलपही या मतदारसंघात दावेदार असल्याने तेही शरद पवार यांना भेटून आले आणि प्रसंगी राष्ट्रवादीकडून उमेदवारी करण्याच्या तयारीत होते. जागा वाटपात अजन स्पष्टता नाही.
विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा मतदारसंघात मंत्री असलेले तानाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटात सामील झाले असून ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला हवी आहे. तर देवळालीच्या जागेबाबत उद्धवसेना आग्रही आहे. त्यामुळे जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास उद्धवसेनेकडून योगेश घोलप यांची दावेदारी अधिक बळकट होणार आहे.