Nashik Politics ( Marathi News ) : सलग दहा वर्षांपासून मंत्रिपद असलेल्या दादा भुसे यांना व त्यांच्या शिंदेसेना या पक्षाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मालेगाव बाह्य या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात यंदा प्रथमच दोन मातब्बरांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे मतदारसंघाबाहेर पडणे त्यांना शक्य झालेले नाही. नांदगावात कांदे यांच्यापुढे मोठे आव्हान तर देवळालीत शिंदेसेनेच्या जिल्हानेत्यांची रणनीती तोंडघशी पडली आहे. एकत्रित शिवसेनेने गेल्यावेळी ९ जागा लढविल्या असताना यंदा शिंदे सेनेला केवळ दोनच जागा मिळाल्याने भुसे यांच्या नेतृत्वाविषयी शिवसैनिकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे. शिंदेसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी गुरुवारी नाशिकमध्ये येऊन पक्षातील याच अस्वस्थतेचा कानोसा घेतल्याचे वृत्त आहे.
शिवसेना फुटीनंतर नाशिक जिल्ह्यात शिंदेसेनेकडून उध्दव सेनेला सर्वाधिक हादरे बसले होते. उध्दवसेनेचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी त्यावेळी शिंदेसेनेकडून मोहीमच उघडण्यात आली आणि एकेका आघाड्यांवर उध्दवसेनेला खिंडार पाडण्यात आले. मात्र नाशिक काबीज करण्याच्या मनसुब्यांना जिल्हा नेत्यांकडे कर्तृत्व, संघटनकौशल्य व दूरदृष्टीचा अभाव असल्याने लोकसभा निवडणुकीत पहिला फटका बसला. दहा वर्षांपासून हक्काची असलेली नाशिकची जागा उध्दवसेनेने खेचून घेतली. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पराभवात जिल्हा नेत्यांच्या असहकार्याची चर्चा रंगली. आता विधानसभेच्या रणांगणात शिंदेसेना तहात कमी पडली आणि केवळ दोनच जागा त्यांच्या पदरात पडल्या. या उलट उध्दवसेनेने आघाडीत ६ जागा मिळविल्या. पालकमंत्री दादा भुसे हे शिंदेसेनेचे असतानाही महायुतीच्या प्रचारात दिसत नसल्याने शिंदेसेनेला झाले काय, असा शिवसैनिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा नेतृत्वाची कोंडी
शिंदेसेनेचे पालकमंत्री असल्याने दादा भुसे यांच्याकडून शिंदेसेनेच्या किंबहुना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडणे अपेक्षित असतांना ते केवळ आपल्याच मतदारसंघात अडकून पडल्याचे दिसत आहे. त्यांना त्यांचेच एकेकाळचे कट्टर समर्थक बंडूकाका बच्छाव यांनी चांगलेच आव्हान उभे केल्याने मालेगावातच त्यांची कोंडी झाली. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा म्हणून भाजपचे सुनील गायकवाड यांच्यासह काही पदाधिकारी उघडपणे बच्छाव यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. शेजारील मालेगाव मध्यमध्ये तर महायुतीला उमेदवार देखील मिळू शकला नसल्याने पालकमंत्र्यांचा प्रभावाविषयी प्रश्न उपस्थित झाला. २०१४ पासून राज्य सरकारमध्ये मंत्रिपद सांभाळणाऱ्या दादा भुसे यांना केवळ स्वतःच्या मतदारसंघात अडकविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद आणि महायुतीत तर थेट पालकमंत्री मिळाले असले, तरी त्यांना विधानसभेत आपले पालकत्व राखता आलेले नाही.
सुहास कांदे पडले एकाकी
नांदगावचे शिंदेसेनेचे उमेदवार आपल्या वादग्रस्त भूमिकेने नेहमीच चर्चेत राहिले आहेत. पाच वर्षांपासून सत्ताधारी आमदार राहिलेल्या कांदे यांचा तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबतचा वाद जगजाहीर आहेत. तत्कालीन आघाडीत पालकमंत्री असलेल्या भुजबळांविरोधात त्यांनी थेट कोर्टाची पायरी चढली. इतके नव्हे तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधातही थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली होती. त्यामुळे त्यांच्यातही फार सख्य राहिलेले नाही. त्यामुळे नांदगावमध्ये पक्षाचेच पालकमंत्री फिरकलेले नाहीत तर तत्कालीन पालकमंत्र्यांनी दंड थोपटलेले असल्याने कांदे यांची कोंडी झाली आहे. शिंदेसेनेच्या या दोन उमेदवारांची डोकेदुखी वाढलेली असताना महायुतीतील घटकपक्ष भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाशी जिल्हा नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे उभा डाव मांडला गेला आहे. याउलट अजित पवार गटाने तर त्यांची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
अहिरराव, महाले यांनी केली दमछाक
एकसंध शिवसेना असताना जिल्ह्यात ९ जागांवर २०१९ मध्ये निवडणूक लढविण्यात आली होती. मात्र, शिंदे सेनेच्या वाट्याला आता मालेगाव आणि नांदगाव अशा दोनच जागा आल्या. अजित पवार गटाला प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात दिंडोरी व देवळाली मतदारसंघात एबी फॉर्म देण्याचा प्रयोग घडला. पण तो देखील अंगलट आला. धनराज महाले आणि राजश्री अहिरराव या दोन्ही उमेदवारांनी जिल्हा नेत्यांची पुरती दमछाक केली. महाले यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली तरी अहिरराव यांनी अजिबात दाद दिली नाही. जिल्हा नेत्यांची रणनीती तोंडघशी पडली. या तीनही मतदारसंघात शिंदेसेनेची डोकेदुखी कमी झालेली नाही.
इगतपुरीत डाव फसला
इगतपुरीत एबी फॉर्म देऊन उमेदवार उभा करण्याचे प्रयत्न झाले तर उमेदवारच हाती लागला नाही. एबी फॉर्म मिळण्यापूर्वीच तेथील उमेदवाराने मनसेकडून उमेदवारी स्वीकारली. देवळालीतही शिंदेसेनेकडून अहिरराव यांना सहकार्य मिळत नसल्याने त्यांनाही आता मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागत आहे. जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारणाऱ्या शिंदेसेनेची आता मात्र कोंडी होतानाच दिसतेय.