लोकमत न्यूज नेटवर्क सातपूर/सिडको : एकदा तरी सत्ता हाती द्या. महाराष्ट्रात नवनिर्माण करून दाखवितो. नाशिकमध्ये आयटी पार्क उभारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी साद मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी सातपूर व सिडको येथील प्रचार सभेत मतदारांना घातली. शरद पवार यांनी फक्त बारामतीचा विकास केला, त्यामुळे ते कसले महाराष्ट्राचे नेते ते तर बारामती तालुक्याचे नेते आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतरच महाराष्ट्रात जातीपातीचे बीज पेरले गेले, असा आरोपदेखील राज यांनी केला.
सातपूर येथील अशोक नगरात तर सिडकोतील पवननगर मैदानात शनिवारी सायंकाळी सभा झाली. व्यासपीठावर पक्षाचे उमेदवार दिनकर पाटील, प्रसाद सानप, काशिनाथ मेंगाळ, मोहिनी जाधव, योगेश सूर्यवंशी (संगमनेर), पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदी उपस्थित होते. राज्यात आरक्षणाचा विषय नाहक तापविला जात आहे. सर्वच पक्ष नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे मुद्दामहून डोळेझाक करीत असल्याचे सांगून राज यांनी राज्यातील प्रत्येक प्रकल्पात भूमिपुत्रांनाच नोकरी देण्याची मागणी केली.
मंदिरे उभारण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी त्यांनी केली. दिनकर पाटील यांनी उमेदवार म्हणून डावलल्याबद्दल भाजपा नेत्यांवर टीका केली. नाशिक पश्चिममध्ये गुंडगिरी फोफावली असल्याचे ते म्हणाले.
खुर्चीची हौस नाही सांगून उद्धव ठाकरेंवर टीका
मला लालदिव्याची हौस नसल्याचे सांगून राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तुम्हाला मागील निवडणुकीत मतदारांनी युती म्हणून निवडून दिले अन् तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांना आयुष्यभर विरोध केला त्यांच्या मांडीवर जाऊन बसलात. हा मतदारांचा अवमान असून, त्याचा हिशेब मतदार या निवडणुकीत घेतील, असा हल्लाबोल राज यांनी उद्धव यांचेवर केला.