लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : राज्यात बहुतांश ठिकाणी महायुतीतील बंडखोरी वाढली आहे. भाजप बंडखोर केदा आहेरांसह इतरांशी चर्चा सुरू आहे, त्यांचे मन वळविण्यात आम्हाला यश येईल. महायुतीतील इतर बंडखोरांशीही वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असून माघारीच्या विहित मुदतीपर्यंत त्यांनी माघार घेतलेली असेल असा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१) नाशिक येथे आले असता ते बोलत होते.
समीर भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे महायुतीत तणाव वाढला असे विचारले असता समीर यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शिंदेसेनेने अजित पवार गटाचा उमेदवार असलेल्या ठिकाणी एबी फॉर्म दिला आहे. मात्र त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल. माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत अनेक बंडखोरांनी माघार घेतलेली असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याबाबत फडणवीस यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. पराभवाला काही तरी कारण हवे यासाठी संजय राऊत वातावरणनिर्मिती करीत आहेत. राज्यात महायुतीला चांगले यश मिळणार अशी चिन्हे असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. त्यामुळेच नैराश्यातून असे आरोप होत असल्याचा दावाही महाजन यांनी केला.
मी तडजोड करणार नाही
मी संघाचा स्वयंसेवक आणि भाजपचा कार्यकर्ता आहे. काही ठिकाणी मी माझ्या कार्यकर्त्यांना भाजपविरोधात बळ दिल्याच्या अफवा पसरत आहेत. मी पक्षाविरोधी कोणतेही पाऊल उचलणार नाही. माझ्याविरोधात अफवा पसरविणाऱ्यांना मी कार्यातून उत्तर देईल, मैत्रीपूर्ण लढतीला आमचा कुठेच पाठिंबा नाही, असा दावाही महाजन यांनी केला.