Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:24 PM2024-10-24T12:24:32+5:302024-10-24T12:27:57+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात आज अर्ज भरण्यासाठी नेत्यांनी गर्दी केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ): राज्यात विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आजपासून अर्ज दाखल करण्यात सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील नेत्यांनीही अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ दिंडोरी विधानसभेत अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी झिरवाळ यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं. शरद पवार यांचा मला दुरून आशीर्वाद असल्याचे झिरवाळ यांनी म्हटले.
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी महायुती सरकारसोबत जात मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे समोर आले. अजित पवार यांना ४० हून अधिक आमदारांनी पाठिंबा दिला. यात दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचाही समावेश आहे. दरम्यान, आता आमदार झिरवाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी मधून अर्ज दाखल केला आहे.
अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार नरहरी झिरवाळ यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी झिरवाळ म्हणाले, शरद पवार यांना कोणही चॅलेंज करुच शकत नाही. त्यांना फक्त निवडणुकीपुरतच सगळी विरोधत करतात. माझं कामकाज शरद पवार यांना माहित आहे, माझी गरज समाजाला आहे, म्हणून शरद पवार मला दुरून का होईन पण आशीर्वाद देतील, असं मोठं विधान अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
आमदार नरहरी झिरवाळ म्हणाले, महाले आणि आम्ही आतेभाऊ आणि मामेभाऊ आहोत त्यामुळे ते मला सहकार्य करतील अशी अपेक्षा मी तरी ठेवली आहे. मी त्यांना विनंती करणार आहे, त्याचा निर्णय त्यांनी घ्यावा. आम्ही एकच आहोत त्यांना जर माझं नुकसान होतं आहे असं वाटत असेल तर ते अर्ज मागे घेतील, असंही झिरवाळ म्हणाले. महायुतीचे आज जागावाटप जाहीर होईल. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून मी तीनवेळा निवडून आलो आहे, आता चौथ्यांदा अर्ज दाखल करणार आहे.विकास कामामुळे जनता मला पुन्हा विजयी करेल अशी मला खात्री आहे, असा विश्वासही नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केला.