लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : काहीशा प्रतीक्षेनंतर विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना भाजपने उमेदवारी देत नाशिक मध्यचा गड कायम राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर काँग्रेसकडून ही जागा खेचून आणत उद्धवसेनेकडून वसंत गीते हे दहा वर्षांनंतर पुन्हा रिंगणात उतरले असले तरी काँग्रेसची हक्काची उमेदवारी गेल्याने चकीत झालेल्या डॉ. हेमलता पाटील यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार कायम ठेवला असल्याने नाशिक मध्य मतदारसंघातील लढत ही तिरंगी होण्याची चिन्हे आहेत.
या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात 'मविआ'ने आघाडी घेत माजी आमदार वसंत गीते यांचे नाव जाहीर केल्याने दुखावल्या गेलेल्या डॉ. हेमलता पाटील यांनी काँग्रेसकडून उमेदवारी परत मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, अखेरीस त्यांनी अपक्ष अर्ज भरत लढण्याबाबत ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपने 'मविआ'चे पत्ते बघून विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर फरांदे या पुन्हा पूर्ण तयारीनिशी लढण्यास सज्ज झाल्या आहेत.
तर मनसेकडून अजून एक महिला उमेदवार सुजाता डेरे यांचे नाव चर्चेत असताना अचानकपणे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धवसेनेतून उडी मारलेल्या मुशीर सय्यद यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्याने जुने नाशिकमधील मतांची फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रारंभिक टप्प्यात नाशिक मध्यची लढत सध्या तरी तिरंगी होत असल्याचे दिसून येत आहे.
महायुतीने नाशिकमधील तीन मतदारसंघांमध्ये उमेदवारी वाटप करताना सोशल इंजिनिअरिंग करीत दोन जागांवर मराठा, एका जागेवर ओबीसी अशी उमेदवारी दिली असली तरी मविआला हे सोशल इंजिनिअरिंग साधता आलेले नाही. त्यामुळे नाशिकमध्ये जातीय समीकरणात महायुतीची चाल योग्य ठरते? की लोकसभेप्रमाणे जुने नाशिक मविआला बढत देते? तसेच मविआच्या हुकलेल्या सोशल इंजिनिअरिंगमधील तिसरा कोण कुणाला अधिक झटका देतो, त्यावर नाशिक मध्यचे पुढील चित्र बदलणार की कायम राहणार, त्याचा कल निश्चित होणार आहे.