लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : विधानसभेच्या जागांसाठी महायुती आणि महाआघाडीतील रस्सीखेच अजूनही सुरूच असल्याने नाशिक महानगरातील केवळ 'नाशिक पश्चिम'च्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून आमदार सीमा हिरे यांना महाविकास आघाडीकडून सुधाकर बडगुजर आणि मनसेत आजच प्रवेश केलेल्या दिनकर पाटील अशी किमान तिरंगी लढत रंगणार आहे.
मात्र, नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि देवळाली या अन्य तीन मतदारसंघांमध्ये केवळ एका बाजूचाच प्रमुख उमेदवार निश्चित झाला असून, दुसरा प्रमुख प्रतिस्पर्धी कोण? त्याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट नाही. नाशिकमधील उमेदवारीची लढाई अगदी हातघाईवर आली असल्याने अनपेक्षित घडामोडींनादेखील अखेरच्या टप्प्यात वेग आला आहे.
महायुतीकडून दोन दिवसांपूर्वीच भाजपने नाशिक पूर्वमधून आमदार राहुल ढिकले, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांची उमेदवारी जाहीर केली होती. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेदेखील देवळालीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनाच उमेदवारी देत महायुतीने तीन जागांवरील उमेदवार निश्चिती केली. मात्र, महाआघाडीच्या वतीने उद्धवसेनेकडून बुधवारी (दि. २३) केवळ नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवारांमध्ये अनुक्रमे सुधाकर बडगुजर आणि वसंत गिते यांचीच नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे काँग्रेसला मनपा क्षेत्रातील एकाही जागेवर दाव्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
बहुतांश जागांवर तिरंगी, चौरंगी लढती शक्य
राज्यातील सद्यस्थिती पाहता शहरातील चारही जागांवर अटी-तटीच्या लढती होणार असून प्रत्येक निवडणुकीतील विजयाचे मताधिक्य अत्यल्प राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्ये चारही जागांवर महायुती, महाविकास आघाडी मनसे. तिसरी आघाडीच्या उमेदवारांमध्ये चरस दिसन येणार आहे.
नाशिक पूर्व: भाजपने विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनाच उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या मतदारसंघात त्यांना अन्य पक्षांतून तगडा प्रतिस्पर्धीच नसल्याची परिस्थिती होती. मात्र, भाजपचेच माजी स्थायी सभापती गणेश गिते यांच्यासह कामगार नेते जगदीश गोडसे यांनीदेखील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी जोर लावला आहे. त्यात या विभागात वंचित बहुजन पक्ष तसेच तिसरी आघाडी कोणाला उमेदवारी देते त्यावरच चित्र स्पष्ट होऊ शकेल.
नाशिक मध्य: या मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात महाविकास आघाडीने बाजी मारत माजी आमदार वसंत गिते यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे आता गिते यांच्याविरोधात भाजपकडून विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचेच नाव कायम राहते की हिमगौरी आडके किवा अन्य कुणाचे नाव पुढे केले जाते ? तसेच या मतदारसंघात मनसेकडून कुणाला उमेदवारी दिली जाते ? त्यावरदेखील या मतदारसंघाचा कल निश्चित होऊ शकणार आहे.
नाशिक पश्चिम: भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पक्षांतर्गत प्रखर आणि उघड विरोध होऊनदेखील पक्षश्रेष्ठींनी पहिल्याच यादीत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे; तर त्यांच्याविरोधात उद्धवसेनेकडून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे आव्हान राहणार आहे. त्यात हिरे यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या दिनकर पाटील यांनी बुधवारीच भाजपमधून मनसेत उडी घेत उमेदवारीदेखील पटकावल्याने नाशिक पश्चिमची लढत किमान तिरंगी होण्याची चिन्हे आहेत.
देवळाली: राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, या मतदारसंघात त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून नक्की कुणाला उमेदवारी मिळणार ? त्याबाबतचे चित्र पूर्णपणे धूसर आहे. शरद पवार गटाकडून १७ हून अधिक उमेदवार इच्छुक असल्याने त्यातून नक्की कुणाला उमेदवारी दिली जाते? तसेच तिसरी आघाडी, वंचित बहुजनकडून कुणाला उमेदवारी दिली जाते, त्यावर चित्र स्पष्ट होणार आहे.