महायुतीची डोकेदुखी वाढली; मुख्यमंत्री शिंदेंनी एबी फॉर्म दिलेले दोन उमेदवार गायब!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 10:02 AM2024-11-04T10:02:00+5:302024-11-04T10:03:06+5:30
देवळाली आणि दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी एबी फॉर्म दिलेले दोन्ही उमेदवार कालपासून नॉट रिचेबल असल्याचे समजते.
Nashik Politics ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. मात्र शेवटच्या दिवशीही महायुती आणि महाविकास आघाडीत काही मतदारसंघांमध्ये गोंधळ सुरू असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या काही मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे एबी फॉर्म दिले आहेत. अशातच नाशिकमधील देवळाली आणि दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी एबी फॉर्म दिलेले दोन्ही उमेदवार कालपासून नॉट रिचेबल असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी येथील शिंदेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळालेले धनराज महाले आणि देवळालीतील राजश्री अहिरराव या कालपासून नॉट रिचेबल आहेत. दिंडोरीत राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार नरहरी झिरवळ तर देवळालीतून सरोज अहिरे यांना तिकीट देण्यात आलं आहे. मात्र असं असतानाही एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी दिंडोरीतून धनराज महाले आणि देवळालीतून राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म दिले होते. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी म्हणजे आज हा तिढा सुटून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार माघार घेतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता हे उमेदवारच नॉट रिचेबल झाल्याने महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
देवळालीत तिरंगी लढत?
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्याविरोधात उद्धवसेनेत प्रवेश केलेल्या योगेश घोलप अशीच गत वर्षाप्रमाणेच लढत होण्याची शक्यता उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या पाच मिनिटांपर्यंत होती.मात्र, शिंदेसेनेने अचानकपणे राजश्री अहीरराव यांनादेखील एबी फॉर्म देत रणांगणात उतरवल्याने ही लढत किमान तिरंगी होण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत. त्याशिवाय अपक्ष उमेदवारी केलेले लक्ष्मण मंडाले, वंचित बहुजन आघाडी तसेच अन्य काही अपक्षांकडून आज काय निर्णय घेतले जातात, तसेच आज दुपारी ३ वाजेपर्यंत महायुतीमध्ये वरिष्ठ स्तरावर काय निर्णय होणार? त्यावर या मतदारसंघातील कल स्पष्ट होऊ शकणार आहे.