उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 07:57 AM2024-10-29T07:57:05+5:302024-10-29T08:00:00+5:30

कॉग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 uddhav thackeray group get more seat than congress in nashik | उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात

उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातील चार पैकी दोन जागा मागणार आणि मिळवणार असे दावे करणाऱ्या कॉग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मुखभंग झाला आहे. जागा वाटपाची चर्चा सुरू असताना उद्धवसेनेने वरिष्ठ पातळीवर जागा सोडवून घेतल्या आणि संबंधित उमेदवारांना मुंबईत पाचारण करून गनिमी काव्याने एबी फॉर्मही देऊन टाकले. मात्र, स्थानिक पातळीवरील इच्छुकांना खबरदेखील नव्हती. त्यामुळेच कॉग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक शहर विधानसभा मतदारसंघ हा १९९२ पासून भाजप, समाजवादी आणि तत्सम पक्षाच्या ताब्यात होता. २००४ मध्ये काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी हा इतिहास खोडून काढला. मात्र, २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर नाशिक मतदारसंघ काँग्रेस पक्षाला अद्यापही मिळू शकला नाही.

यंदा शिवसेनेने नाशिक पश्चिम आणि मध्य मध्ये दावा केला होता, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने देवळाली आणि पूर्ववर दावा सांगितला होता. काँग्रेसने मध्य आणि पूर्व मतदारसंघावर दावा सांगितला असला तरी त्यांचा जोर मध्य नाशिक मतदारसंघावर होता. उद्धवसेनेने अगोदरच सुधाकर बडगुजर यांच्यासाठी पश्चिम आरक्षित करून ठेवला होता. मध्यमध्ये पक्षीय स्तरावर वसंत गिते यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी त्याला पक्षातील अन्य इच्छुकांची फारशी सहमती नव्हती. गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून ऐनवेळी उमेदवारी देऊनही डॉ. हेमलता पाटील यांनी चांगली मते मिळविली. म्हणजेच पक्षाच्या कठीण प्रसंगात निवडणूक लढवली. त्यामुळे यंदा तर लोकसभा निवडणुकीतील वारे लक्षात आल्यानंतर त्यांना हा मतदारसंघ अधिक अनुकूल वाटत होता. 

मात्र, त्यांच्या पक्षातच अनेक इच्छुक असल्याने दावेदारीचे वातावरणच अधिक होते. काँग्रेसमधील या बेबनावाला राज्यातील पक्ष नेतेही थांबवू शकत नव्हते. त्यातच वरिष्ठ पातळीवर उद्धवसेनेने प्रतिष्ठेचा प्रश्न करून नाशिक पश्चिम आणि मध्यची जागा सोडवून घेतली आणि जाहीर वाच्यता न करता वसंत गिते तसेच सुधाकर बडगुजर यांना मुंबईस बोलावून एबी फॉर्म देण्यात आले.

देवळाली मतदारसंघात उद्धवसेनेला दिवाळी बोनस... 

देवळाली मतदारसंघातून गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज आहिरे यांनी शिवसेनेचे योगेश घोलप यांना पराभूत करून निवडणूक जिंकली होती. त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडे जाणार होती. मात्र, जागांच्या तडजोडीत ही जागा उद्धवसेनेला गेली. त्यामुळे चार पैकी तीन जागा उद्धवसेनेकडे गेल्याने त्यांना एका जागेचा बोनस मिळाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाला मात्र, पूर्व नाशिक या एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 uddhav thackeray group get more seat than congress in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.