लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने जिल्ह्यातील १२ उमेदवार घोषित केल्यानंतर महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेने आपल्या पहिल्या यादीत पाच मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये उद्धवसेनेने नाशिक पश्चिम व नाशिक मध्य हे दोन मतदारसंघ जागा वाटपात आपल्याकडे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आता उर्वरित दहा जागा महाविकास आघाडीतील कोणकोणत्या पक्षांच्या वाट्याला येतात, याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. महायुतीत भाजपने पहिली यादी जाहीर करताना आपले चार उमेदवार घोषित केले, तर नाशिक मध्यमधील जागेचा अद्याप फैसला झालेला नाही. महायुतीतीलच राष्ट्रवादी अजित पवार गटाने सहा, तर शिंदेसेनेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. महायुतीकडून नाशिक मध्य, मालेगाव मध्य आणि निफाड या तीन मतदारसंघांतील उमेदवारी अद्याप घोषित झालेली नसल्याने या जागांबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
महायुतीने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतल्यानंतर बुधवारी (दि. २३) महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष उद्धवसेनेने आपली ६५ उमेदवारांची पहिली यादी घोषित करताना त्यात नाशिक जिल्ह्यातील पाच मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये नांदगावमधून गणेश धात्रक, निफाडमधून माजी आमदार अनिल कदम, मालेगाव बाह्यमधून अद्वय हिरे, नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर, तर नाशिक मध्यमधून माजी आमदार वसंत गिते यांच्या उमेदवारीचा समावेश आहे.
जाहीर केलेल्या पाच जागांमध्ये नाशिक पश्चिम व नाशिक मध्य मतदारसंघ उद्धवसेनेच्या वाट्याला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस व शरद पवार गटाच्या ताब्यातील या जागा उद्धवसेनेने आपल्याकडे खेचल्या आहेत. जिल्ह्यातील उर्वरित दहा जागांपैकी कोणत्या जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षांच्या वाट्याला येतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे. उद्धवसेनेने गेल्या निवडणुकीत २००९ मध्ये मालेगाव बाह्य, निफाड, येवला, नांदगाव, कळवण, सिन्नर, दिंडोरी, देवळाली व इगतपुरी, अशा नऊ जागा लढविल्या होत्या. त्यातील नांदगाव व मालेगाव बाह्य या दोन जागांवर यश मिळाले होते. आता उर्वरित जागांचे वाटप कशाप्रकारे झाले याचा उलगडा काही तासांत होणार आहे.
काँग्रेसच्या वाट्याला किती जागा?
मागील निवडणुकीत काँग्रेसने जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, चांदवड, नाशिक मध्य व इगतपुरी या पाच जागा लढविल्या होत्या. त्यातील केवळ इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघात यश मिळाले होते. आता महाविकास आघाडीत उद्धवसेनेने मालेगाव बाह्य व नाशिक मध्य या मतदारसंघांतून उमेदवार जाहीर करत काँग्रेसकडून या जागा खेचून घेतल्या आहेत. त्यामुळे आता काँग्रेसच्या वाट्याला मालेगाव मध्य, चांदवड व इगतपुरी या जागा येण्याची शक्यता आहे. त्यातही मालेगाव मध्यमधून आघाडीतील समाजवादी पक्षाने अगोदरच उमेदवार जाहीर करून टाकला आहे. उर्वरित येवला, दिंडोरी, देवळाली, नाशिक पूर्व, सिन्नर, बागलाण या जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला, तर कळवण-सुरगाण्याची जागा घटक पक्ष माकपला सोडली जाण्याची शक्यता आहे. अथवा यामध्ये बदलही शक्य असल्याने इच्छुकांची धडधड वाढली आहे.
देवयानी फरांदे, दिलीप बनकर वेटिंगवर
महायुतीच्या तीन जागांवरील उमेदवार अद्याप घोषित होण्याची शक्यता आहे. त्यात मालेगाव मध्य, नाशिक मध्य व निफाड मतदारसंघाचा समावेश आहे. निफाडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दिलीप बनकर, नाशिक मध्य मधून भाजपच्या आमदार देवयानी फरांदे हे अद्याप वेटिंगवर आहेत, तर मालेगाव मध्यची जागा ही भाजपने गेल्यावेळी लढविली असल्याने कोण उमेदवार दिला जातो, याबाबत उत्सुकता आहे.