लोकमत न्यूज नेटवर्क वणी/दिंडोरी: जयंत पाटील, राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व ५२ आमदारांनी पहाटेच्या शपथविधीवेळी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यातील छगन भुजबळ यांच्यासह सर्व आमदारांनी एकत्रितपणे विकासासाठी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. असे असताना एकट्या झिरवाळ यांनाच का दोष देता? झिरवाळ आदिवासी आहे म्हणून टीकेचे लक्ष्य करायचे, हे धोरण योग्य नाही, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांना उत्तर दिले. वणी, पिंपळगाव बसवंत आणि सिन्नर येथे झालेल्या जाहीर सभांमध्ये त्यांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.
दिंडोरी पेठ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ वणी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली.
फेक नॅरेटिव्ह पसरवले
अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये देत आहे. भावांचे लाईट बिल माफ केले आहे. सर्व योजना सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेला संविधान बदलाचा फेक नरेटिव्ह पसरवत मते घेतली; पण आता त्यांच्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही, असे अजित पवार म्हणाले. व्यासपीठावर माजी आमदार धनराज महाले, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, सुरेश डोखळे, भाऊलाल तांबडे, रवींद्र पगार उपस्थित होते.
जिल्हा बँकेला मदत करणार
नरहरी झिरवाळ यांनी सातत्याने जिल्हा बँक वाचविण्याचे दृष्टीने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यासाठी पाठपुरावा केला. ७०० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव ही तयार होता; पण आचारसंहिता लागली म्हणून ही मदत आली नाही. जिल्हा बँकेला मदत करत तुमची अर्थवाहिनी पुन्हा सुरू करू, असे पवार यांनी सांगितले.
नदीजोड प्रकल्पामुळे अवर्षणग्रस्त शिक्का पुसणार
सिन्नर : शेती, उद्योग व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन नदीजोड प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह सिन्नरचा अवर्षणग्रस्ताचा शिक्का पुसणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सिन्नर येथे महायुतीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर विष्णूपंत म्हैसधुणे, देवीदास पिंगळे, शशिकांत गाडे, नामकर्ण आवारे, जयंत आव्हाड आदी उपस्थित होते.