नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र वगळता अन्य विभागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी व उद्योग जगताचे लक्ष लागून असलेली उत्तर महाराष्ट्र विभागाची निवडणूकही अखेर आजी-माजी अध्यक्ष व विश्वस्तांच्या मध्यस्थीमुळे बिनविरोध झाली आहे. नाशिकमधील उपाध्यक्ष व कार्यकारी सदस्यमंडळाच्या २१ जागांसाठी होणारी निवडणूक टाळण्यासाठी आजी-माजी अध्यक्षांसह विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी एकत्रित बैठक घेत परस्पर विरोधी गटात चेंबरचे उपाध्यक्षपद व शाखा चेअरमनपदाचे वाटप करून समेट घडवून आणले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राची निवडणूकही बिनविरोध झाल्याची घोषणा चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली.
सारडा संकुल येथील महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात मंगळवारी (दि. २३) पत्रकार परिषदेत विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष विक्रम सारडा, माजी अध्यक्ष हेमंत राठी, नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी एकत्र बसून सामंजस्याने उत्तर महाराष्ट्राची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाशिकच्या कार्यकारिणी पदाच्या २१ जागांसाठी आजपर्यंतची बिनविरोध निवडणुकीची परंपरा यावर्षीही कायम राहिली असून चेंबरच्या उपाध्यक्षपदासाठी सुधाकर देशमुख यांची तर सुनिता फाल्गुने यांची नाशिक शाखा चेअरमनपदी निवड करण्यात आली. को-चेअरमन पदी संधी संजय सोनवणे यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. चेंबरची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी हेमंत गायकवाड, संदीप भंडारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यकारिणी सदस्य
हेमंत गायकवाड, कैलास आहेर, व्हिनस वाणी, संजय राठी, रवी जैन, रवींद्र झोपे, हेमंत कांकरिया, नेमिचंद कोचर, मनीष रावल, संजय महाजन, सचिन शहा, अंजु सिंघल, भावेश मानेक, राजेश मालपुरे, डॉ. मिथिला कापडणीस, स्वप्नील जैन, दत्ता भालेराव, राजाराम सांगळे, सचिन जाधव , मिलिंद राजपूत, प्रशांत जोशी यांना कार्यकारिणी समितीवर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी अध्यक्ष विक्रम सारडा व हेमंत राठी यांच्यासह अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली.
कोट
चेंबरच्या बिनविरोध निवडणुकीने यापुढील काळात राज्यातील व्यापार उद्योगाच्या विकासासाठी बळ मिळणार असून महाराष्ट्र चेंबर त्यासाठी कायम प्रयत्नशील आहेत. उद्योग, कृषी व व्यापाराच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिकपणे सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहेत.
- ललित गांधी, नवनिर्वाचित अध्यक्ष , महाराष्ट्र चेंबर