स्वबळाची भाषा करायला आधी काँग्रेसकडे बळ तर हवे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 16:32 IST2021-12-05T16:30:11+5:302021-12-05T16:32:11+5:30
फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची निवडणूक होत असून, त्यामुळेच सर्वच पक्ष सध्या स्वबळाची भाषा करीत आहेत. काँग्रेसचीही तीच भाषा आहे. मित्रपक्ष ...

स्वबळाची भाषा करायला आधी काँग्रेसकडे बळ तर हवे!
फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची निवडणूक होत असून, त्यामुळेच सर्वच पक्ष सध्या स्वबळाची भाषा करीत आहेत. काँग्रेसचीही तीच भाषा आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादीकडून गद्दारी केली जाते आणि उमेदवार पाडले जातात, ही तीच ती कारणे देऊन शनिवारी पक्षाच्या बैठकीत एकमुखाने स्वबळाची मागणी करण्यात आली. रविवारी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासमवेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही येणार असून, त्याच्या पूर्वसंध्येला बैठकीत मागणी करणे म्हणजे, आपल्या भावना या नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा एक भाग आहे.
स्वबळाची भाषा केली, तरी त्याची पक्षात कितपत तयारी आहे? एके काळी महापालिकेत सत्तेवर असलेल्या या पक्षांची सध्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. महापालिकेत सहा नगरसेवक निवडून आले, हा इतिहास झाला, तरी आता संघटन वाढविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत काय झाले? प्रभारी शहराध्यक्ष आठ वर्षे ठेवल्यानंतर नवीन अध्यक्ष नियुक्त करण्याच्या हालचालीच आता सुरू झाल्या आहेत. निवडणुकीसाठी दोन महिने जेमतेम शिल्लक असताना, पक्षाची राज्य स्तरावरच अशी तयारी असेल, तर कार्यकर्त्यांना काय बेाल देणार? समजा निवडणूक स्वबळावर लढायचे ठरले, तर काँग्रेस किती जागा अधिक वाढवू शकेल. एकंदरीतच आज तरी काँग्रेसला राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, असे दिसते.
- संजय पाठक