नाशिक - विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीमधील संभाव्य लढतींचे चित्र आज स्पष्ट होत आहे. दरम्यान, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवारअशोक मुर्तडक यांनी माघार घेतली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब सानप अशी थेट लढत रंगणार आहे. माघार घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी अशोक मुर्तडक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार माघार घेत असल्याचे सांगितले. ''मनसे ही राज ठाकरेंच्या आदेशावर चालते. मी आदेश पाळला. विधानसभा निवडणुकीसाठी मला आठ दिवसांपूर्वीच उमेदवारी जाहीर झाली होती. अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारीसुद्धा 15-20 दिवसांत होत नाही. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी माझी पूर्वतयारी झाली नव्हती. त्यात खर्चाचीही अडचण होती,'' असे मुर्तडक यांनी सांगितले. मात्र पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीला मी तयारीनिशी विधानसभेस तयारी करून राजसाहेबांच्या आदेशानुसार रिंगणात उतरणार, असेही त्यांनी जाहीर केले. दरम्यान, अशोक मुर्तडक यांनी कुठल्याही पक्षाला थेट पाठिंबा जाहीर केलेला नाही. मात्र आपण मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण जिल्ह्यात फिरणार असेही मुर्तडक यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये 'इंजिना'ची 'घड्याळा'ला साथ? राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे उमेदवाराची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 1:25 PM