नाशिक - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आम्ही नाशिक दत्तक घेऊ. मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची गरज नाशिककरांना नाही. आम्हाला गरीब बाप चालेल पण स्वाभिमानी हवा, खरे प्रेम करणारा हवा अशा शब्दात शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, नाशिकचा विकास छगन भुजबळांनी मोठ्या प्रमाणात केला पण या सरकारने नाशिककडे साफ दुर्लक्ष केले, विशेष करून एचएएल सारख्या कारखान्याची दूरवस्था असो किंवा पर्यटन विकासाला बसलेली खीळ आहे. आता मात्र हा इतिहासच पुस्तकातून काढण्याचा निर्णय या सरकारने घेतलाय आणि जनतेला सांगतात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून हे राज्य पुढे घेऊन जाणार आहोत, हा दुटप्पीपणा आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच महाराष्ट्राच्या नव्या पिढीतील मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व समजावे म्हणून इयत्ता चौथीच्या शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. महाराजांच्या चरित्रामधून नव्या पिढीमध्ये जिद्द निर्माण करण्याची भूमिका पूर्वीच्या सरकारची होती असं शरद पवारांनी सांगितले.
दरम्यान, या जगात मुलांना अन्नाचा पुरवठा करण्यासंदर्भात जे देश आहेत त्याच्यामध्ये भारतातील मुलांना सगळ्यात कमी अन्न मिळतं. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा अन्नाचं प्रमाण मुलांना अधिक मिळतं. ही भारतासारख्या देशाला बातमी चांगली आहे का? असा संतप्त सवाल करतानाच जो अन्नधान्याची निर्यात जगात करतो त्या देशातील मुलांना अन्न खायला मिळत नाही. ही बातमी जागतिक पातळीवर आपल्याबद्दल छापून येते एवढी बेईज्जत या लोकांच्या राजवटीत केली जाते अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.
प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याची पावले टाकली ते लोकांना पसंत नाही कॉंग्रेसचं कधी राज्य आलं तर कधी पराभव झाला.असे अनेक चढउतार पाहिलेल्या कॉंग्रेसच्या कार्यालयावर धाड घालत चार लोकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु आहे. निवडणूक सुरु असताना असा प्रकार घडणं योग्य नाही. मलाही त्रास देण्याचा प्रयत्न झाला असे सांगतानाच ईडीचा घडलेला किस्सा पवारांनी सांगितला.