वणी : परिसरातील जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे वणी-सापुतारा रस्त्यावरील ठाणपाडा भागात पाण्याची पातळी धोकादायक वाढल्याने महाराष्ट्र व गुजरात राज्याचा संपर्कतुटला होता. रविवारी दिवसभर दोन्ही राज्यांना जोडणारी वाहतूक बंद होती. उंच सखल असलेल्या या भागात दाट वृक्षराजीमुळे पर्जन्याचे प्रमाण तुलनात्मकरीत्या अधिक असते. या परिसरात वीस तासांपेक्षा अधिक झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे हातगड भाग परिसराच्या पुढे असलेल्या ठाणपाडा याठिकाणी वळणावर असलेल्या खोल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. सदरचे पाणी धोकादायकरीत्या रस्त्यावरून अधिकतम पातळीने वाहू लागल्याने या मार्गावरून गुजरातकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. पाण्याचा जोर ओसरल्यानंतर दोन्ही बाजूंची येणारी व जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे छत्रपती युवक कामगार संघटना अध्यक्ष किशोर शेलार यांनी दिली. दरम्यान, रविवारी सुटीच्या दिवशी गुजरात राज्यातील सापुतारा येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली. (वार्ताहर)
महाराष्ट्र-गुजरात रहदारी ठप्प
By admin | Published: July 11, 2016 11:26 PM