नाशिक - मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वैयक्तीक नात्याची महाराष्ट्राला ओळख आहे. त्यामुळेच, राज ठाकरेशरद पवारांवर स्तुतीसुमने उधळताना कधीही हात आखडता घेत नाहीत. यापूर्वीही अनेकदा त्यांनी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीवर भाष्य केलं आहे. आता, शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, राज यांनी त्यांची मुक्तकंठपणे प्रशंसा केली.
शरद पवार यांनी यांचा वाढदिवस साजरा झाला, आपण कशारितीने शुभेच्छा दिल्या, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला होता. त्यावर, मी बुके पाठवला... ८१ वर्षं त्यांची पूर्ण झाली आहेत. आपण ८१ व्या वर्षी सहस्रचंद्रदर्शन साजरं करतो... राजकारणात महाराष्ट्र गेली ६० वर्ष शरदचंद्रदर्शन करतोय, ६० वर्षे सातत्य ठेवणं ही साधी सोपी सरळ गोष्ट नाही.. मी काल फोनवरून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या, असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचं कौतुक केलं. राजकारणात मतभेद वेगळे असतात, पण त्यांच्या राजकीय वाटचालीचं घडामोडीचं मी लहान आहे म्हणून कौतुक हा शब्द न वापरता, प्रशंसा म्हणता येईल, असे म्हणत कौतुक केले.
मी वयाने बराच लहान
ज्या प्रकारे या वयात, काही व्याधी वगैरे घेऊन ज्या प्रकारे फिरताहेत, काम करताहेत ही विलक्षण गोष्ट... राजकीय मतभेद असणं हा एक भाग झाला, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत... चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारा महाराष्ट्र आहे. मी वयाने बराच लहान आहे, पण जेवढी त्या गुणांची प्रशंसा करावी तेवढी कमीच असल्याचं राज यांनी म्हटलं.
मग देशात आफ्रिकन लोकांचं राज्य आहे का?
देशात शरद पवार यांच्या नेतृत्त्वात आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसला बाजूला ठेवायच असं कधी म्हणतात, तर शिवसेना म्हणते काँग्रेसशिवाय भाजपला दूर ठेवता येत नाही, यासंदर्भात राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राज ठाकरेंनी राहुल गांधींच्या राजस्थानच्या सभेतीली विधानाचा उल्लेख केला. मी आत्ता राहुल गांधींचं स्टेटमेंट वाचलं, मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही. या देशामध्ये हिंदूंचं राज्य आलं पाहिजे, असं राहुल गांधी म्हणतात. मग, आत्ता काय आफ्रिकन लोकं राहतात का येथे, कोण करतंय राज्य?, असे म्हणत राज ठाकरेंनी राहुल गांधींच्या विधानाची खिल्ली उडवली.