नाशिक - लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या शांतीगिरी महाराज यांच्यामुळे शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढली असून असे असले तरी मनसे तुमच्या पाठीशी आहे. शांतीगिरी महाराजांनी निवडणूक लढविली नसती तर महायुतीचा विजय अधिक सोपा झाला असता असा दावा मनसेचे लोकसभेचे मुख्य समन्वयक अभिजित पानसे यांनी केला.
शनिवारी (दि. ११) मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा मनोहर गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना पानसे बोलत होते. व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, गणेश सातपुते, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, पराग शिंत्रे, माजी महापौर अशोक मुर्तडक, रतनकुमार इचम, अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, सुजाता डेरे, संदीप भवर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पानसे म्हणाले, महायुतीसाठी २० मे पर्यंत असे काम करा की पुन्हा त्यांनी तुम्हाला मान दिला पाहिजे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी जाहीर केले की मोदींना पाठिंबा म्हणून मनसे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करतील. परंतु तुम्ही शिंदेसेना-भाजपचे कार्यकर्ते नाहीत हे लक्षात ठेवा. आपण इतर नेत्यांपेक्षा मोठे आहोत. त्यामुळे आपणच आपल्या माणसांचा मान ठेवा. मोदी निवडून आले तर संविधान बदल होणार नाही ही उगीच अफवा पसरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आभार नामदेव पाटील यांनी मानले.
अमित ठाकरे यांची अनुपस्थितीमनसेच्या मेळाव्याला अमित ठाकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते. परंतु, मुंबई येथे आगामी दोन टप्प्यांतील निवडणुकांची राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक असल्याने अमित ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत असे अभिजित पानसे यांनी सांगितले.
मनसेच्या व्यासपीठावर हेमंत गोडसेमहायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे मेळाव्याच्या मध्यंतरात अचानक मनसेच्या व्यासपीठावर दाखल झाले. यावेळी त्यांनी २००९ ची निवडणूक अजूनही आठवत असल्याचे सांगितले. त्यावेळी ते मनसेच्या तिकिटावर उभे होते. राज्यात मनसेकडून त्यांना सर्वाधिक मते पडली होती व किरकोळ मतांनी हरल्याचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.