नाशिक : परतीच्या आणि अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने राज्यातील शेतपिकांना मोठा तडाखा बसला आणि आता बुलबूल चक्रीवादळामुळे शेतकरी धास्तावले आहेत. मात्र, या वादळाचा महाराष्टÑाला फटका बसणार नसल्याचा निर्वाळा हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी दिला आहे.
बुलबूल वादळाचा पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, या वादळाचा महाराष्टÑाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. गेल्या शुक्रवारी (दि.८) मुंबई व इतर काही भागांत झालेला पाऊस व ढगाळ वातावरण हा जम्मू आणि काश्मीर येथील बर्फवृष्टीचा परिणाम आहे. चक्रीवादळाचा तो परिणाम नाही, असे जोहरे यांनी स्पष्ट केले आहे. बुलबूल वादळाला न भीता शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीसाठी वाफसा काढण्यासाठी सुरुवात करावी, असेदेखील त्यांनी सांगितले.
यंदा जून-जुलैत पावसाने ओढ दिली. मात्र ४ आॅगस्टनंतर पाऊस तुफान बरसला. परतीच्या पावसाने मोठा दणका दिला. त्यानंतर अवकाळी पाऊसदेखील झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत आता किमान बुलबूलचा धोका टळल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.