नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'महाजनादेश यात्रा' करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या यात्रेचा समारोप करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतचा एक 'हिशेब' चुकता केला. नाशिकमधील या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. त्यांच्यासमोरच मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या टिप्पणीला प्रत्युत्तर दिलं.
महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मी जनतेला पाच वर्षांच्या कामांचा हिशेब द्यायला निघालो आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावरून, शरद पवारांनी त्यांना टोमणा मारला होता. हिशेब देणं ही चांगली गोष्ट आहे. पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, असं त्यांनी खोचकपणे म्हटलं होतं. त्यावर, तुमची मानसिकताच राजेशाही आहे आणि म्हणूनच लोकांनी तुम्हाला घरी बसवलं, असं टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि हिशेब देणं हे सेवकाचं काम असतं, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्देः
>> माझ्यासारख्या महाराष्ट्राच्या सोशल इंजिनीअरिंगमध्ये न बसणाऱ्या माणसाला मोदींनी मुख्यमंत्री केलं.
>> महाजनादेश यात्रेला प्रतिसाद केवळ नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वासामुळे.
>> शेतकऱ्यांसाठी दुष्काळ मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा निर्धार.
>> पाच वर्षांत 89 लाख लोकांना महाराष्ट्रात रोजगार दिला.
>> नाशिकला स्मार्ट सिटी बनवून विकासाचे केंद्र बनविणार.
>> महाजनादेश यात्रेदरम्यान लोकांनी साडेतीन कोटींचे धनादेश लोककल्याणकारी कामासाठी मुख्यमंत्री निधीला दिले.
(सगळे 'ज्युनिअर' बोलले, पण नरेंद्र मोदींच्या सभेत एकनाथ खडसे भाषणापासून वंचित!)