Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीत पहिली बंडखोरी? नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात धनराज महालेंनी भरला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 05:02 PM2024-10-24T17:02:11+5:302024-10-24T17:06:22+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज अर्ज दाखल केला.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज गुरुवारी राज्यातील काही नेत्यांनी अर्ज दाखल केले, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. याच मतदारसंघात आता महायुतीमधील शिंदे गटाचे नेते धनराज महाले यांनीही अर्ज दाखल केला आहे, यामुळे महायुतीमध्ये बंडखोरीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपासाठी बैठकांचे सत्र सुरू आहेत. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून दिंडोरी विधानसभा मतदारसंघासाठी नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे माजी आमदार धनराज महाले यांनीही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. यामुळे आता त्यांनीही अर्ज दाखल केला आहे. यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धनराज महाले हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. आमदार नरहरी झिरवाळ यांनी त्यांचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला. काही दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला होता पण आता पुन्हा त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार नरहरी झिरवाळ यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी झिरवाळ म्हणाले, शरद पवार यांना कोणही चॅलेंज करुच शकत नाही. त्यांना फक्त निवडणुकीपुरतच सगळी विरोधत करतात. माझं कामकाज शरद पवार यांना माहित आहे, माझी गरज समाजाला आहे, म्हणून शरद पवार मला दुरून का होईन पण आशीर्वाद देतील, असं मोठं विधान अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
आमदार नरहरी झिरवाळ म्हणाले, महाले आणि आम्ही आतेभाऊ आणि मामेभाऊ आहोत त्यामुळे ते मला सहकार्य करतील अशी अपेक्षा मी तरी ठेवली आहे. मी त्यांना विनंती करणार आहे, त्याचा निर्णय त्यांनी घ्यावा. आम्ही एकच आहोत त्यांना जर माझं नुकसान होतं आहे असं वाटत असेल तर ते अर्ज मागे घेतील, असंही झिरवाळ म्हणाले. महायुतीचे आज जागावाटप जाहीर होईल. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून मी तीनवेळा निवडून आलो आहे, आता चौथ्यांदा अर्ज दाखल करणार आहे.विकास कामामुळे जनता मला पुन्हा विजयी करेल अशी मला खात्री आहे, असा विश्वासही नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केला.