नाशिक : केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय मास्टर्स महिला बास्केटबॉल स्पर्धेत नाशिकच्या पूनम शहा यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन घडवित स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
केरळमध्ये नुकत्याच झालेल्या या स्पर्धेतील सर्वच सामने अटीतटीचे आणि चुरशीचे झाले. नाशिकच्या पूनम यांनी संपूर्ण स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करीत संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. द्वितीय स्थानासाठीच्या लढतीत महाराष्ट्राच्या संघाचा सामना तामिळनाडूशी झाला. मात्र, निसटत्या फरकासह पराभव पत्करावा लागल्याने महाराष्ट्राच्या संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या संघात कर्णधार पूनम शहा यांच्यासह नाशिकच्याच स्वाती मिसर, मुग्धा कुलकर्णी तसेच पुणे आणि मुंबईच्या मीना शाह, अमी मोम्बाया, अनिता कृष्णन, अबरनाजी तसेच रेल्वेच्या वंदना पाटील आणि कोल्हापूरच्या वर्षा जोशी यांचा सहभाग होता. या संघासमवेत उज्ज्वला लोखंडे या प्रशिक्षक म्हणून होत्या.