नाशिक : येत्या २६ जानेवारीला भारताच्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारल्याचे पडसाद महापालिकेच्या महासभेत उमटले आणि कॉँग्रेसच्या सदस्यांनी फलक झळकावत पंतप्रधान कार्यालयाचा निषेध नोंदविला.महापालिकेच्या महासभेत कॉँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी महापौरांना पत्र देऊन प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारल्याबद्दल निषेधाचा ठराव करण्याची मागणी केली. यावेळी खैरे यांनी सांगितले की, दरवर्षी दिल्लीत होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होत असतो. मागील वर्षी दिंडीचा देखावा असलेला चित्ररथ सादर करण्यात आला होता आणि महाराष्ट्राने प्रथम क्रमांकही पटकाविला होता. यंदा महाराष्ट्राने खंडोबाच्या जागरण-गोंधळाची परंपरा सांगणारा व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा चित्ररथ बनविण्याची तयारी केली होती; परंतु पंतप्रधान कार्यालयाने सदर चित्ररथास परवानगी नाकारल्याने महाराष्ट्रातील जनतेचा अवमान झाला आहे. ही एक प्रकारची असहिष्णुताच असल्याचा आरोप खैरे यांनी केला. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान करणाऱ्या पंतप्रधान कार्यालयाचा निषेधाचा ठराव पाठविण्याचीही सूचनाही खैरे यांनी केली. यावेळी कॉँगे्रसच्या सदस्यांनी निषेधाचा फलक झळकवत पंतप्रधान कार्यालयाविरोधी घोषणा दिल्या. याप्रसंगी कॉँग्रेसचे सदस्य राहुल दिवे, लक्ष्मण जायभावे, उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, अश्विनी बोरस्ते, योगीता अहेर, विमल पाटील, समीना मेमन आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला
By admin | Published: December 18, 2015 12:13 AM