नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्रंबकेश्वर रायाचा पालखी सोहळा आज मोठ्या आनंदाने वाजत गाजत साजरा करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वत्र निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळेच निर्बंध लादण्यात आल्याने त्रंबकेश्वरचा पालखी सोहळा साजरा करण्यात आला नव्हता.
देशासह आता राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वकाही सुरळीत सुरू आहे. शासनाने निर्बंध उठवले असून सार्वजनिक वाहतूक सेवाही सुरू करण्यात आली आहे. प्रार्थनास्थळे खुली करण्यात आली असून शाळाही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे, आता सण आणि उत्सव साजरे होत आहेत. यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हळू हळू निर्बंध शिथिल झाले. कोरोना काळानंतर आज पहिल्यांदाच त्रंबकेश्वरचा पालखी सोहळा साजरा करण्यात आला. महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरातून पालखी सोहळा वाजत गाजत परिसरातून निघाला.