नाशिक : महात्मा गांधी म्हणजे सामाजिक जीवनातील संकुचित विचार बाजूला सारून समाजाला व्यापक अशा बंधुत्वाकडे नेण्यासाठी माणसाला दिला जाणारा चिरकाल विचार आहे. तो नवनिर्माणाचा विषय होता आणि यापुढेही राहील, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले. मु. शं. औरंगाबाद सभागृहात ‘नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव २०१८’ अंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालयातर्फे ‘ग्रंथजत्रा’ उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘महात्मा गांधी यांचे जीवन व कार्य’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे प्रादेशिक अधिकारी अनंत वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी, जिल्हा कोषागार अधिकारी विलास गांगुर्डे, पंडितराव आवारे, दत्ता पगार, श्रीकांत बेणी आदी उपस्थित होते. उत्तम कांबळे म्हणाले, गांधीजींनी अहिंसा या सामर्थ्यशाली शास्त्राच्या सहाय्याने या स्वातंत्र्य चळवळीला व्यापक स्वरूप देताना माणसातील भेद कमी करण्यासाठी जाती निर्मूलन आणि वंचितांच्या उद्धाराची चळवळ सुरू केली.नाशिक जिल्हा ग्रंथोत्सवाच्या समारोपप्रसंगी ठाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांनी ‘व्यक्तिमत विकास’ विषयावर व्याख्यानात देताना तणावमुक्त जीवन जगण्याचा सल्ला उपस्थिताना दिला. यावेळी निवृत्त न्यायाधीश प्रकाश मोरे, सचिन जोपुळे आदी उपस्थित होते.
महात्मा गांधींचा विचार चिरकाल : उत्तम कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:41 AM