नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसह विविध सामाजिक संघटनांची गणेश विसर्जनानंतर बैठक बोलावली असून, मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्याविषयी आश्वासन दिले आहे. मात्र ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकार बैठकांवर बैठका घेत असताना मराठा समाजाचे सर्वच आरक्षण जाऊनही राज्य सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याचे नमूद करीत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर दुजाभाव करीत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचे दुःख आहे. मात्र ओबीसी समाजाचे काही नेते त्यांचीच दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ओबीसी समाजास घटनात्मक आरक्षण देण्यात आलेले नाही. शासकीय आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने आता जातीय जनसंख्येनुसार आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली
इन्फो-
शिवसंग्राम स्थानिक निवडणुका लढवणार
आगामी मनपा, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक शिवसंग्राम पक्ष लढवणार असल्याची माहिती देतानाच यासंदर्भात विविध संघटनांचे पदाधिकारी व संघटनेच्या कार्यकर्त्यांशीही चर्चा झाली असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ऑनलाइन रौलेट जुगारमुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे हा गेम चालवणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.