नाशिकरोड : नाशिकरोड प्रभाग समिती सभापती निवडणुकीत भाजप व शिवसेना, राष्ट्रवादी मिळून समसमान सदस्य असल्याने चिठ्ठी पद्धतीने निवड निश्चित केल्यास ज्यांचे नशीब साथ देईल त्या पक्षाचा सभापती होईल, अशी चिन्हे आहेत. नाशिकरोड प्रभाग समितीमध्ये २३ सदस्य होते. त्यामध्ये भाजपचे १२ व शिवसेनेचे ११ सदस्य होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका सरोज अहिरे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवून त्या आमदार झाल्या. अहिरे यांनी राजीनामा दिल्याने प्रभाग २२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पवार निवडून आले. पहिले तीन वर्ष भाजपचे सुमन सातभाई, पंडित आवारे, विशाल संगमनेरे हे सभापती राहिले होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची युती होऊन राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे गेल्या प्रभाग सभापती निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती झाल्याने त्यांचे संख्याबळ १२ होऊन बहुमत झाल्याने शिवसेनेच्या जयश्री खर्जुल या सभापतिपदी विराजमान झाल्या, तर भाजपच्या मीराबाई हांडगे यांचा पराभव झाला.
नाशिकरोड प्रभाग सभापतिपदासाठी शिवसेनेकडून नगरसेवक प्रशांत दिवे व भाजपकडून नगरसेविका सुमन सातभाई व मीराबाई हांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सातभाई या यापूर्वी सभापती होऊन गेल्या असून, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या गटाच्या म्हणून ओळखल्या जातात, तर मीराबाई हांडगे या विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या गटाच्या ओळखल्या जातात. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येणार असून, त्यावेळी उमेदवार निश्चित होणार आहे. पंचवटी प्रभाग समितीमध्ये कोणत्या गटाचे भाजपचे सभापती होतात त्यावर नाशिकरोडची भाजपची उमेदवारी निश्चित होईल, असे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगदीश पवार यांनी सभापतिपदासाठी दावा केला होता; मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे राष्ट्रवादीचा सभापतिपदावरील दावा संपुष्टात आला आहे. राज्यात आघाडी सरकार असून, शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती होईल अशी अपेक्षा आहे. तसेच दिवे व पवार त्यांचे मामा-भाचे नाते आहे. शिवसेनेकडून एकच उमेदवार असून, भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळाली तरी ज्याचे नशीब बलवत्तर तो सभापतिपदी विराजमान होईल, असे सध्याचे चित्र आहे. तसेच चिठ्ठी काढताना ऐनवेळी कुठला नियम लावला जातो तेदेखील महत्त्वाचे आहे.