नाशिक : सर्वसामान्य नागरिकांना भारनियमनातून मुक्त करण्यासाठी सौरऊर्जा हा एक उत्तम उपाय आहेच; परंतु ही वीज महावितरण ग्राहकांकडून घेणार आहे. त्या बदल्यात ग्राहकाला वीज देयकात सवलत देणार असून, तसे धोरण शासनाने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे एका नाशिककर महिलेमुळे वीज नियामक आयोगाने या विषयाला चालना दिल्याने महाराष्ट्रात हा विषय मार्गी लागला आहे. राज्यात विविध शासकीय आणि खासगी वीज प्रकल्प साकारले जात आहे. तरीही विजेचा प्रश्न सुटलेला नाही. विजेचे भारनियमन शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना डोकेदुखी ठरते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. पवन आणि सौर ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जेचा घरगुतीस्तरावर वापर होऊ लागला आहे. नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या योगीता रवींद्र अमृतकर यांनी घरावर सौरऊर्जेचे पॅनल बसवून स्वत:च्या घरापुरती लागणारी वीज स्वत:च तयार केली आणि अतिरिक्त वीज महावितरणला विकली तर असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून त्यांनी २०१२-१३ मध्ये नाशिकमध्ये वीज नियामक आयोगाने प्रस्तावित वीज दरवाढीसंदर्भात घेतलेल्या सुनावणीच्या वेळी हा प्रस्ताव सादर केला होता. नाशिकमधील चेतनानगरमधील आपल्या घराच्या छतावर त्यांनी २०० वॅट वीज निर्मितीचे सौरऊर्जा उपकरण बसवले; परंतु प्रत्यक्षात आपल्याला शंभर वॅट वीज लागत असल्याने अतिरिक्त वीज महावितरणने खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी वीज नियामक आयोगाच्या सुनावणीच्या वेळी केली. सौर वीज ही पर्यावरण स्नेही-हरित वीज असल्याने राज्य शासनाची मागणी पूर्र्ण करू शकेल आणि त्यातून राज्यातील वीज भारनियमन कमी होऊ शकेल, असे मत त्यांनी मांडले होते आणि वीज नियामक आयोगाच्या इतिवृत्तात तशी नोंद करण्यात आली होती. त्यानुसार नियामक आयोगाने महावितरणला दिलेल्या सूचनेनुसार आता धोरण जाहीर करण्यात आले आहे.सामान्य नागरिकांना, सोसायट्यांना सहकारी तत्त्वावर वीजनिर्मिती करण्याची आणि ती स्वत:साठी वापरतानाच शासनाला किंवा परवानाधारक वीज कंपनीला विकून आर्थिक लाभाची संधी देऊ केली आहे. छतावर तयार होणारी वीज खरेदी करण्यासाठी महावितरण संबंधित ग्राहकाशी करार करणार असून त्या ग्राहकाकडे वीज कंपनीच्या वीज पुरवठ्याचे मीटर असेलच परंतु वीज घेण्यासाठीदेखील मीटर बसवले जाईल आणि ज्या मीटरमध्ये आयात विजेची नोंद ठेवली जाईल आणि जेवढी वीज आयात होईल तेवढीच ती ग्राहकाला पुरवलेल्या विजेच्या बिलातून वजा केली जाईल. म्हणजेच ग्राहकाने दिडशे युनिटचा वापर झाला असेल आणि ग्राहकाने महावितरणला आपल्या वापराव्यतिरिक्त ५० युनिट वीज पुरवली असेल तर ग्राहकाकडून दिडशे युनिट वीज आकारणीऐवजी शंभर युनिटसाठी आकारणी केली जाईल. त्यामुळे सौर उर्जेचा वापर करून नागरिकांना स्वत:च्या घरगुती वीजबिलात बचत करता येऊ शकते. केंद्र शासनाने तर सौर उर्जेचा वापर करणाऱ्या आस्थापनांना अलीकडेच आयकरात सवलतही जाहीर केली आहे. मात्र, राज्यात शासनाने असा निर्णय घ्यावा यासाठी नाशिकमधीलच योगीता रवींद्र अमृतकर यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. (प्रतिनिधी)
घरगुती सौरऊर्जा घेणार महावितरण
By admin | Published: January 17, 2016 11:06 PM