मनोज देवरे/ कळवण : जन्मापासून दोन्ही पायांना असलेले व्यंग डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी उपचारानंतर दूर झाल्याने दोन वर्षीय बालिकेच्या पायांना बळ मिळाले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र मांतर्गत या बालिकेवर उपचार करण्यात आल्याने या बालिकेच्या स्वप्नांना उभारी मिळणार आहे.कळवण येथील संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या कु. माहेश्वरी प्रमोद कोळी या दोन वर्षीय बालिकेच्या दोन्ही पायांना जन्मत:च व्यंग्य होते. त्यामुळे तिच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दोन्ही पायांना व्यंग असल्याने पालकांनाही चिंता सतावत होती. योगायोगाने कळवण उपजिल्हा रु ग्णालयात शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र मांतर्गत आयोजित संदर्भ सेवा शिबिरात उपजिल्हा रु ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ज्ञ डॉ.दीपक बहिरम यांनी माहेश्वरीची तपासणी केली. त्यावेळीच तिच्या पायांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील उपचारांसाठी तिला नाशिक येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील अस्थिरोगतज्ञ डॉ.निलेश शेलार, मरियम काझी यांनी बालिकेच्या व्यंग असलेल्या दोन्ही पायांवर यशस्वीरित्या उपचार करून तिचे पाय सरळ केले. या उपचाराला प्रतिसाद मिळाल्यामुळे व माहेश्वरीचे पाय सरळ झाल्याने तिच्या पालकांनीही आनंद व्यक्त करत डॉक्टरांचे आभार मानले.
माहेश्वरीच्या पायांना मिळाले बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 4:52 PM
कळवण : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार
ठळक मुद्देमाहेश्वरी प्रमोद कोळी या दोन वर्षीय बालिकेच्या दोन्ही पायांना जन्मत:च व्यंग्य होते.