सातपूर : महिन्याभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जवळपास साडेआठशे उद्योगांनी उद्योग सुरू करण्याची परवानगी घेतली आहे,असे असले तरी नाशिकमधील महत्त्वपूर्ण समजले जाणारे महिंद्रा, बॉशसह अन्य वाहन उद्योग मात्र ३ मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांचे वेंडर असलेल्या लघु उद्योगांवर अद्यापही अस्थिरतेचे वातावरण असल्याने असे उद्योग परवानगीसाठी पुढे आलेले नाहीत. जर मोठे उद्योग प्रकल्प सुरू होणार नसतील तर लघु उद्योग सुरू होऊन फारसा लाभ होणार नाही, अशी द्विधा स्थिती निर्माण झाली आहे.कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी २३ मार्चपासून ते ३ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करून परंतु २० एप्रिलनंतर काही ठिकाणी शिथिलता आणली. महानगरपालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील तेराशे उद्योगांनी आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते. नाशिक जिल्हा आॅटोमोबाइल (वाहन उद्योग) आणि इंजिनिअरिंग हब म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सर्वांत मोठे उद्योग म्हणून महिंद्र अँड महिंद्र कंपनी आणि बॉश कंपनीकडे पाहिले जाते. या दोन्ही कारखान्यांवर आधारित वेंडरची (लघुउद्योग) संख्या जवळपास एक हजारांच्या आसपास आहे. या दोन्ही कारखान्यांत आणि संलग्न लघुउद्योगात सुमारे २५ हजार कामगार काम करतात. जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्याने वाहन उद्योगांनी उद्योग सुरू करण्यास स्वारस्य दाखविलेले नाही. वाहन उद्योगाव्यतिरिक्त अन्य उद्योग सुरू होणार आहेत. मोठे उद्योग सुरू होणार नसतील तर लघुउद्योगांचे आर्थिक गणित आणखी गडगडणार आहे.
महिंद्रा, बॉशसह मोठे वाहन उद्योग बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:40 PM