सातपूर : महिंद्रा अॅण्ड महिंंद्रा कंपनीने नाशिक व इगतपुरी येथील प्रकल्पात दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. नवीन गुंतवणूक होऊ शकते. तर लघु व मध्यम उद्योगांना बूस्ट नक्कीच मिळणार आहे. या गुंतवणुकीमुळे उद्योग क्षेत्राला अच्छे दिन येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मुंबई येथे राज्य शासनाच्या वतीने भरविण्यात आलेल्या मेक इन इंडिया प्रदर्शनातच महिंद्रा अॅण्ड महिंद्राने नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. ती आता मूर्तस्वरूपात होत आहे. नाशिकमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून एकही मोठा उद्योग प्रकल्प आलेला नाही. नाशिकमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी निमाच्या वतीने मे महिन्यात मुंबईत ‘मेक इन नाशिक’च्या आयोजनाची तयारी सुरू आहे. अशातच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने नाशिक आणि इगतपुरीच्या कारखान्यात पंधराशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचे उद्योग क्षेत्रात स्वागत केले जात आहे. लघु आणि मध्यम उद्योगांना या गुंतवणुकीमुळे बूस्ट मिळणार आहे. रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. नवीन गुंतवणूक येण्याची शक्यता वाढणार आहे. नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्याची संधी मिळणार आहे. जुन्या व्हेंडर्सला कामे मिळतील आणि नवीन व्हेंडर्स तयार होतील. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. एकंदरीत उद्योग क्षेत्राला या गुंतवणुकीमुळे आशेचा किरण दिसत आहे. (वार्ताहर)
‘महिंद्रा’च्या गुंतवणुकीमुळे उद्योग क्षेत्राला मोठी चालना
By admin | Published: February 13, 2017 12:18 AM