याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामदास स्वामीनगरमधील नेताजी सुभाष कॉलनीतील बंकू कुटीर बंगल्यात राहणाऱ्या फिर्यादी उमा बंकुबिहारी मलिक(८४) यांनी फिर्यादीनुसार, बंकु कुटीर बंगल्यात मलिक या एकट्याच राहतात. दीड महिन्यापूर्वी ‘मेड हब’ एजन्सीकडे त्यांनी संपर्क साधून त्यांच्यामार्फत मंगला विखे या महिलेला दरमहा पंधरा हजार रुपये पगारावर मोलकरीण म्हणून कामावर ठेवले.
बुधवारी (दि.१३) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मलिक आंघोळ करून बाहेर आल्या असता मोलकरीण मंगलाने त्यांचा गळा दाबला आणि ढकलून दिले. यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या बेशुध्द पडल्या होत्या. यावेळी संशयित मंगलाने पुन्हा त्यांच्या तोंडावर उशी दाबून धरली आणि त्यांच्या कानातील तीन लाखांची हिऱ्याची कर्णफुले बळजबरीने काढून घेत त्यांना बेदम मारहाण केली. जेव्हा ही बाब त्यांच्या नातू जय अरिंगळे यांना समजली तेव्हा त्याने धाव घेत आजी उमा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात मोलकरीण मंगला विखे विरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेण्यात आले आहे.