नांदगाव : चार दिवसांपूर्वी भार्डी धनेर शिवारात राष्ट्रीय पक्षी मोराच्या शिकारप्रकरणी फरार असलेल्या मुख्य संशयिताला शुक्रवारी (दि.८) अखेर वनविभागाला ताब्यात घेण्यात यश मिळाले असून न्यायालयाने त्याला चार दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. मोराच्या शिकारप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता तीन झाली आहे.
मालेगाव शहरातील रजा चौक या ठिकाणी सापळा रचून सिनेस्टाईल पाठलाग करून सराईत आरोपी अशपाक अंजुम महम्मद अनवर याला अटक करण्यात आली. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये वन्यप्राण्यांची व पक्ष्यांची शिकार करणे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यास ७ वर्षापर्यंत शिक्षा आहे. त्यामुळे असे गुन्हे करणाऱ्यांवर वनविभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहायक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सी.डी. कासारू हे करत आहे. सदर कारवाईत वनपाल ए.ई. सोनवणे, एम. एम.राठोड, टी.ई.भुजबळ, डी.एफ. वडगे व वनरक्षक एम. बी. पाटील, पी. आर. पाटील, आर. के. दोंड, ए. एम. वाघ, एन.के. राठोड, एस. बी. शिरसाठ, सी. आर. मार्गेपाड, आर. बी. शिंदे, संजय बेडवाल, श्रीमती. एम.ए. पाटील यांनी भाग घेतला होता.