नाशिक : सतत आणि अखंड वीजपुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी असतानाही नाशिककरांना दर शनिवारी सक्तीच्या वीज कपातीला सामोरे जावे लागत आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दर आठवड्याला वीज खंडित केली जात असल्याने दुरुस्तीचा हा प्रामाणिक प्रयत्न की छुपी वीज कपात अशी चर्चा ग्राहकांमध्ये होत आहे. महावितरण कंपनीकडून शहरी आणि ग्रामीण भागात वीजपुरवठा केला जातो. राज्यात विजेची टंचाई नसल्याने सर्वत्र सुरळीत वीजपुरवठा सुरळीत असल्याचा दावा महावितरण करीत असताना शहरातील नागरिक मात्र खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जात आहेत. महावितरणकडून दर शनिवारी काही तासांसाठी वीजपुवठा खंडित केला जातो. देखभाल दुरुस्ती सुरू असल्याचे जाहीर करून शहरातील प्रत्येक भागातील वीजपुरवठा बंद केला जातो. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून नाशिककरांना महावितरणच्या या कामाचा फटका सहन करावा लागत आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दर शनिवारी वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याचे जाहीर केले जाते; परंतु नेमके कामाचे स्वरूप काय याची कोणतीही माहिती या प्रकटनामध्ये दिली जात नाही. प्रत्यक्ष संपर्क साधल्यानंतर वीजतारा ओढून घेणे आणि झाडांच्या फांद्या छाटणे अशी कारणे पुढे केली जातात. ही कारणे खरी आहेच असे मान्य केले तर दर आठवड्याला झाडाच्या किती फांद्या वाढत असणार आणि वादळ नसतानाही वीजतारा कशा लोंबकळणारा हा प्रश्न कायम आहे. काही वर्षांपूर्वी केवळ पावसाळ्यापूर्वी अशा प्रकारची कामे केली जात होती. परंतु आता दर आठवड्याला वाहिन्यांची दुरुस्ती करावी लागत असेल तर मग महावितरणच्या ‘वीजवहन जाळे दुरुस्ती’ अभियानावर खर्च झालेल्या सुमारे कोट्यवधी रुपयांचे काय झाले? देखभाल दर आठवड्याला करावी लागत असेल तर मग या कामांवर देखरेख ठेवणारे सक्षम नाहीत का? असे अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. ( प्रतिनिधी)
देखभाल दुरूस्ती की सक्तीची कपातअनाकलनीय : दर शनिवारी वीज बंद;
By admin | Published: December 22, 2014 1:14 AM