लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय सर्व्हिसेस प्रा. लि., मैत्रेय प्लॉटर्स अॅण्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि., मैत्री रिअलटर अॅण्ड कन्ट्रक्शन प्रा. लि., मैत्री सुवर्णसिद्धी प्रा. लि. या कंपन्यांची मालमत्ता विक्री करून परतावा देण्याच्या आराखडा जाहीर करण्याच्या मागणीसाठी मैत्रेय उपभोक्ता तथा अभिकर्ता असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि़ २१) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला़ निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ दरम्यान, या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली होती़ मैत्रेय कंपनीतील गुंतवणूकदारांना कंपनीकडून परतावा मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ या मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या ‘कष्टाचा पैसा मिळालाच पाहिजे’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ या घोषणांनी शहर परिसर व जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता़ गोल्फ क्लब मैदानापासून सुरू झालेला मोर्चा गंजमाळ सिग्नल, प. सा. नाट्यगृह, महात्मा गांधी रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला़ मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना परतावा नेमका केव्हा व किती दिला जाईल याचा आराखडा जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांची होती़ मैत्रेयमध्ये महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरील २७ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांचे २८०० कोटी रुपये अडकून पडले आहेत़ ५ फेबु्रवारी २०१६ पासून कंपनी बंद पडली असून, गुंतवणूकदारांना परतावा दिलेला नाही़ मैत्रेयसंदर्भात शासन काय कारवाई करते याची माहिती मिळावी, अशी मागणी असोसिएशनचे गोपाल बडगुजर, सचिन अमृतकर, रवींद्र सुतार, चतुर देसले यांनी खेडकर यांच्याकडे केली. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मैत्रेय गुंतवणूकदारांच्या संदर्भात केवळ नाशिक जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचाच प्रश्न निकाली काढण्यात येईल, असा स्पष्ट आदेश दिला आहे. मात्र हा निर्णय संपूर्ण राज्यात लागू करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कंपनीतील गुंतवणूकदारांच्या संपूर्ण माहितीचा डेटा सरकारवाडा पोलीस ठाण्यात जमा असून, त्यानुसार लवकरात लवकर परतावा देण्याची मागणीही यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली़
मैत्रेय गुंतवणूकदारांचा धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:39 AM