उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार व्यापारी व माथाडी युनियन यांच्यात मका पोते भरून देण्याच्या वादावरून गेल्या तीन दिवसांपासून मका लिलाव बंद पडला असून, यावर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची मका विक्रीसाठी अडचण निर्माण झाली आहे. या वादावर बाजार समितीने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी मका उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.येथील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा मालाबरोबरच भुसार (मका) मालाचीही मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. चांगल्याप्रकारे भाव मिळत असल्याने कसमादे परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला शेतीमाल विक्रीस आणतात. परिणामी बाजार समितीत २०० ते ३०० वाहनांमधून पाच ते सहा हजार क्विंटल मालाची आवक होते. या मका वाहनाचे मोजमाप इलेक्ट्रॉनिक्स (भुईकाटा) काट्याद्वारे केली जाते. परंतु वाहनखाली करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून माथाडी कामगारांच्या मदतीने प्रचलित पद्धतीने पोते भरले जात होते. परंतु काही दिवसांपूर्वी व्यापारी व माथाडी यांच्यात पोते भरण्यावरून वाद निर्माण झाल्याने माथाडी युनियनने व्यापाऱ्यांच्या खळ्यात पोते न भरून देता गंजीपद्धतीने खाली करुन देण्याचा निर्णय घेऊन सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव येथेही हीच पद्धत असल्याचे नमूद केले तर दुसरीकडे माथाडी कामगारांनी प्रचलित पद्धतीनुसार पोते न भरून दिल्यास लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्याने मंगळवारपासून (दि.१) मका लिलाव बंद पडला आहे.दरम्यान, कामगार बोर्डच्या निरीक्षकांनी व व्यापारी आपापल्या निर्णयावर ठाम राहत बाजार समितीस निवेदने सादर केली असून, व्यापारी व माथाडी यांच्यात झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु यात समाधानकारक तोडगा न निघाल्याने लिलाव बंदच आहेत. उमराणे बाजार समितीत अन्य बाजार समितीतर्फे मोजमाप आणि खाली करण्याच्या पद्धतीनुसार किंवा प्रचलीत पद्धतीनुसार वाहनखाली करण्याच्या तोडग्यासाठी बाजार समितीचे प्रशासक जितेंद्र शेळके यांच्या मध्यस्थीने बैठक होणार असून, व्यापारी व माथाडी आपापल्या मतावर ठाम असल्याने काय तोडगा निघतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
बाजार समितीत तीन दिवसांंपासून मका लिलाव बंद
By admin | Published: December 03, 2015 9:53 PM