मालेगाव:- तालुक्यातील ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील मका पीक पाकोळी (पतंग) व इतर किटकजन्य रोगांमुळे धोक्यात सापडले आहे. कृषी विभागाकडून पुरविण्यात आलेले सापळे व प्रतिबंधासाठी देण्यात आलेल्या गोळ्याही कुचकामी ठरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मका पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत होत आहे. दररोज हजारो लिटर रासायनिक औषधांची फवारणी शेतकºयांकडून केली जात आहे. यासाठी मोठा आर्थिक भार शेतकºयांना सहन करावा लागत आहेत. किटकजन्य औषध फवारणी साठी शेतकºयांना एकरी ४ ते ५ हजार रुपये खर्च येत आहे. फवारणीसाठी मजूर लावण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. गेल्या वर्षीही अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या कष्टाने उत्पादीत केलेल्या शेतीमालाला ही कवडीमोल भाव मिळाला. या परिस्थितीतून सावरत शेतकºयांनी खरीप हंगामाची तयारी केली. तालुक्यात एकर हुकमी नगदी पीक समजले जाणाºया मका पिकाची सर्वाधिक लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील सुमारे ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र मका पीक र्बयापैकी वाढल्यानंतर त्यावर पतंग व पाकोळी कीटकांनी आक्रमण केले आहे. यासाठी कृषी विभागाकडून शेतकºयांना शेतात सापळे लावण्याचा सल्ला देण्यात आला. शेतकºयांनीही २५ रुपये प्रति सापळा दराने सापळे विकत घेतले मात्र त्यात टाकली जाणारी प्रतिबंधित गोळीचा दर्जा व गुणवत्ता खराब असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम झाला नाही. शेतकºयांना किटकजन्य रोगावर मात करता आली नाही. परिणामी मका उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता मका उत्पादक शेतकºयांकडून केली जात आहे. तालुक्यातील शेतकºयांना योग्य दर्जाचे सापळे व प्रभावी गोळ्यांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
मालेगाव तालुक्यातील मका पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 1:18 PM