उमराणे : चालु वर्षी मका पिकावर लष्करी अळींनी घातलेल्या थैमानानंतर अथक प्रयत्नांतुन वाचिवलेल्या मका पिकाला आता मररोगाचे ग्रहण लागल्याने मका पिकापासुन काही अंशी मिळणार्या उत्पादनाचीही आशा धुसर झाली आहे. त्यामुळे पिकापासुन मिळणारे उत्पन्न तर दुरच परंतु उद्भवलेल्या मररोगामुळे चाराही निकामी झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पेरणीनंतर अवघ्या पंधरा दिवसांपासूनच लष्करी अळींनी प्रथम पोंग्यात व त्यानंतर मका पिकाला लागलेल्या कणसात शिरकाव केल्यानंतर पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करु न काहीअंशी पिक वाचविले.शिवाय गेल्या पंधरा दिवसांपासून उत्तर नक्षत्राचा पाऊस सुरु झाल्याने लष्करी अंळीचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार तोच पिकाला मररोगाचे ग्रहण लागले आहे. मररोगामुळे हिरव्या पिकाच्या मुळ्या नष्ट होऊन झाडे कोमजु लागली आहेत. परिणामी कणसांचे दाणे परिपक्व होण्याआधीच मररोग आल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार असल्याने शेतकरी बेचैन झाला आहे. तर दुसरीकडे या रोगामुळे चाराही कुजुन निकामी होऊ लागल्याने आगामी काळात जनावरांना चारा टंचाईच्या भितीने दुहेरी संकटात सापडला आहे.
मका पिकाला आता मररोगाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 3:10 PM