दरवर्षी दुष्काळ परिसराच्या पाचवीलाच पुजलेला आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटूनही अद्याप जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाही. अपुऱ्या पावसावर पेरण्या केलेले शेतकरी पावसाने पुन्हा ओढ दिल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. अस्मानी आणि सुलतानी संकटात गुरफटलेल्या शेतकऱ्यांच्या दहा ते पंधरा दिवसाच्या मका पिकाला लष्करी अळीने विळखा घातल्यामुळे नवे संकट उभे ठाकले आहे. परिसरात ब-याच शेतक-यांच्या मका पिकावर लष्करी अळीने आक्र मण केले. मका पिकाच्या पानावर पांढरे चट्टे पडू लागले आहेत. ही लष्करी अळी पोग्यातील कोवळी पाने खाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने मका पिक वाया जाण्याचा धोका वाढला आहे. सुरुवातीपासून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांनी हजारो रु पये खर्च करून उभ्या केलेल्या पिकांवर आता कीटकनाशक औषधांची फवारणी करूनही नियंत्रण मिळवता येत नसल्याने अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखायचा कसा असा प्रश्न शेतक-यांना सतावत आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी खेडोपाडी मार्गदर्शन शिबीर राबवत आहेत, त्याचा उपयोग प्रत्यक्षात होताना दिसत नसल्याने खरीप हंगामातील पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील मका पिकाला लष्करी अळीचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 6:59 PM