नाशिक : कमी झालेले उत्पादन, वाढलेली निर्यात आणि अडचणीत असलेली पोल्ट्री इंडस्ट्री, यामुळे या वर्षी मक्याच्या दराने उच्चांक गाठला असून, खुल्या बाजारात मक्याचे दर हमीभाव ओलांडून पुढे गेले आहेत. यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षी मक्याने चांगला हात दिल्याची भावना व्यक्त होत असून, पुढील काही दिवस तरी हे असेच राहाणार असल्याचा अंदाज मका व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मक्याला सध्या २,२५० ते २,३०० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. शासकीय आकडेवारीनुसार, जिल्ह्यात या वर्षीच्या खरिपात दोन लाख २९ हजार ७१४ हेक्टर इतक्या क्षेत्रावर मक्याची पेरणी करण्यात आली होती, तर मक्याला केंद्र शासनाने मकाला १,८७० रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. सुरुवातीला खुल्या बाजारात हमीभावापेक्षा शेतकऱ्यांना कमी दर मिळत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मक्याच्या दराने २,१०० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे. या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी मक्यापेक्षा सोयाबिनला अधिक पसंती दिली. याशिवाय मक्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला असल्याने मक्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्या तुलनेत मक्याला परदेशातूनही मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे, सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात मक्याची निर्यात झाली, याशिवाय सुरुवातीला सोयाबिनवर अवलंबून असलेल्या पोल्ट्री इंडस्ट्रीने सुरुवातीला स्टॉक केला नाही. सोयाबिनचे दर वाढल्यानंतर मात्र ही इंडस्ट्री अडचणीत आली. भांडवल कमी पडल्याने रोजच्या राज मका खरेदी करण्याची वेळ पोल्ट्री कंपन्यांवर आली. उठाव वाढला. मात्र, आवक कमी असल्याने मक्याच्या दराने तेजी गाठण्यास सुरुवात केली आहे.
कोट-
बांगलादेशमधून अजूनही मक्याला मागणी आहे. आपल्याकडील मका संपत आला असला, तरी पाचोरा, जळगाव या भागातील मका येण्यास सुरुवात झाली आहे. काही प्रमाणात बिहारमध्ये माल आहे, पण तो बाहेरच अधिक जाण्याची शक्यता असल्याने, यापुढील काळात मक्याचे दर टिकून राहण्याचा अंदाज आहे. अडचणीत आलल्या पोल्ट्री इंडस्ट्रीमुळेही मक्याच्या दरावर परिणाम झाला आहे.
- सागर थोरात, मका व्यापारी, लासलगाव.
चौकट-
यापूर्वी सुमारे तीन वर्षांपूर्वी मक्याच्या दरात अशीच वाढ झाली होती. त्यावेळीही मका दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला गेला होता. या वर्षी २,२०० ते २,३०० रुपयांपर्यंत मक्याने मजल मारली आहे. सध्या तरी शेतकऱ्यांना कांद्यापेक्षा मका परवडत असल्याचे चित्र आहे.