सिन्नर : सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने हमीभावाने मका खरेदीचा तहसील कार्यालयाच्या कार्यालयामागील शासनाच्या गुदामामध्ये पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते उदय सांगळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तहसीलदार राहुल कोताडे, सभापती कचरू गंधास, व्हाइस चेअरमन छबू थोरात यावेळी उपस्थित होते. सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने हमीभावाने मका खरेदी करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया राबवली होती. प्रतिहेक्टरी ४७ क्विंटल मका शेतकऱ्यांंकडून १८५० रुपये दराने खरेदी केला जाणार आहे. त्यासाठी मार्केटिंग फेडरेशनच्या पोर्टलवर वीस दिवसांत १३०० शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली. शासनाने यावेळी मका खरेदीवर कुठलीही मर्यादा ठेवलेली नसल्याने येत्या जानेवारीअखेरपर्यंत तालुक्यातून २५ हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती गंधास यांनी दिली. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. सध्या मोजणीसाठी दोन काट्यांची व्यवस्था करण्यात आली असून, अजून दोन काटे वाढवण्यात येणार आहेत. शासनाचे सध्याचे गोडाऊन ५ हजार क्विंटल क्षमतेचे असून ते भरल्यानंतर शिर्डी महामार्गावरील मुसळगाव शिवारातील शासकीय गुदामात मका ठेवण्यात येणार आहे. मका खरेदीपासून कुणीही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार असून, मका नोंदणी केलेल्या मात्र, मका काढला नसेल अशा शेतकऱ्यांचाही मका नंबर निघून गेल्यानंतरही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मार्केटिंग फेडरेशनच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नंबरप्रमाणे ठरलेल्या दिवशी मका खरेदीसाठी आणावा, त्यात अडचण असल्यास त्वरित संघास माहिती द्यावी, असे आवाहन गंधास यांनी केले आहे. यावेळी तालुका पुरवठा अधिकारी विशाल धुमाळ, संघाचे संचालक सुखदेव वाजे, दत्तू पाटील आव्हाड, वसंत आव्हाड, रावसाहेब शिंदे, अरुण वारुंगसे, फकिरा हिरे, आर. आर. जाधव, व्यवस्थापक संपत चव्हाणके, दत्ता राजेभोसले हे उपस्थित होते.
देवपूर येथील भास्कर खोले यांची प्रथम हमीभावाने मका खरेदी करण्यात आली. यावेळी अण्णा खोले, दत्ता उगले आदी शेतकरी उपस्थित होते. मका नोंदणी सुरू केल्यापासून अवघ्या वीस दिवसात मका खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.