नाशिक : शहरात सुन्नी पंथीय मुस्लीम बांधवांच्या वतीने ज्येष्ठ धर्मगुरू हजरत इमाम अहमद रझा यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाशिकमधील जुने नाशिक या गावठाण परिसरातून विविध धार्मिक संघटनांच्या वतीने ‘जुलूस-ए-आला हजरत’ काढण्यात आला. या मिरवणूकीत मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. तसेच दारूल ऊलूम सादिकुल उलूम शाही मशिद मदरसा व गौस-ए-आझम मदरश्याचे निवासी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पांढरा इस्लामी पोशाख परिधान करुन जुलूसमध्ये सहभाग नोंदविला. तसेच दावत-ए-इस्लामी या संघटनेच्या वतीने चालविल्या जाणा-या मदरश्यामधील लहान बालकांनीही पारंपरिक पोशाख परिधान करुन मिरवणूकीत संचलन केले. मिरवणूकीचे हे मुख्य आकर्षण ठरले. अग्रभागी मिरवणूकीचे नेतृत्व शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी केले. यावेळी मौलाना महेबुब आलम, मौलानां मुफ्ती शमशोद्दीन मिस्बाही, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी एजाज काझी, हाजी युनुस रजवी, हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकराणी आदि उपस्थित होते.
मिरवणूक चौक मंडई, बागवापुरा, कथडा, चव्हाटा, काजीपुरा, कोकणीपुरामार्गे खडकाळीवरून शहीद अब्दूल हमीद चौकातून मार्गस्थ होत पिंजारघाट रस्त्याने बडी दर्गाच्या मैदानात पोहचली. येथे मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. यावेळी धर्मगुरूंनी आला हजरत यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती उपस्थित मुस्लीम बांधवांना सांगितली. आला हजरत यांनी ओळखलेले शिक्षणाचे महत्त्व आणि समाजाला दिलेले दर्जेदार अशा धार्मिक साहित्यसंपदेचा समाजाने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. आला हजरत यांनी समाजाच्या विकासासाठी त्याग व योगदान दिले आहे, हे विसरून चालणार नाही, असे नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा यांनी यावेळी सांगितले.