नाशिक : सोमवारी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या मतमोजणीत नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या (एनडीएसटी) पंचवार्षिक निवडणुकीत १८ पैकी १० जागा पटकावून शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) बहुमत मिळविले, तर समर्थ पॅनललाही आठ जागा मिळाल्या. प्रगती व आपलं पॅनलला खातेही उघडता आले नाही.शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीची मतमोजणी द्वारका येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी आठ ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत संथगतीने सुरू होती. त्यात नाशिक व पेठ तालुका संचालक पदासाठी समर्थ पॅनलचे संजय चव्हाण व राजेंद्र सावंत विजयी झाले. तर टीडीएफचे भाऊसाहेब शिरसाठ विजयी झाले. मालेगाव मतदारसंघातून समर्थ पॅनलचे हेमंत देशमुख तर टीडीएफचे राजेंद्र निकम विजयी झाले. इगतपुरी, सिन्नर व त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून समर्थ पॅनलचे दत्तात्रय आदिक व टीडीएफ पॅनलचे बाळासाहेब ढोबळे विजयी झाले. निफाड व येवला मतदारसंघातून समर्थ पॅनलचे भीमराज काळे, तर टीडीएफ पॅनलचे रामराव बनकर विजयी झाले. चांदवड मतदारसंघातून टीडीएफ पॅनलचे जिभाऊ शिंदे, तर दिंडोरी मतदारसंघातून टीडीएफ पॅनलचेच भाऊसाहेब पाटील विजयी झाले. कळवण मतदारसंघातून टीडीएफ पॅनलचे संजय देवरे, बागलाण मतदारसंघातून समर्थ पॅनलचे संजय देसले तर महिला राखीव गटातून समर्थ पॅनलच्या भारती पवार व टीडीएफ पॅनलच्या विजया पाटील विजयी झाल्या. अनुसूचित जाती जमाती गटातून समर्थ पॅनलचे कारभारी गांगुर्डे, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास गटातून टीडीएफ पॅनलचे मोहन चकोर, तर इतर मागास प्रवर्गातून टीडीएफ पॅनलचेच अरुण पवार विजयी झाले. शिक्षकांनी शिक्षक लोकशाही आघाडीला या निवडणुकीत पसंती देऊन बहुमत दिल्याचे निकालावरून दिसून आले. (प्रतिनिधी)
शिक्षक लोकशाही आघाडीला बहुमत
By admin | Published: August 04, 2015 11:36 PM