संकेत शुक्ल, नाशिक: मराठा समाजाला आरक्षण देताना ते ओबीसींमधून देणार नाही असे राज्य सरकार म्हणते आहे, तरीही आंदोलन का होतात? हा प्रकार केवळ पक्ष संघटन वाढवण्याच्या हिशोबाने होतो आहे. त्याचा वापर राजकारणासाठी करा पण त्यातून समाजात तेढ निर्माण होवून त्याचा वणवा भडकेल अशी परिस्थिती निर्माण करू नका असे आवाहन दिव्यांग कल्याण विभाग राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांनी शासनासह राजकीय पक्षांना केले.
नाशिक येथील प्रहार संघटनेच्या कार्यक्रमाला आले असता त्यांनी तपोवनातील जपानुष्ठाण सोहळ्याला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. ते म्हणाले मराठा ही जात नाहीच. राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाला आम्ही मराठाच समजतो; मग तो कोणत्याही जातीचा असो. जर जराठा ही स्वतंत्र जात असेल तर राष्ट्रगीतासह अनेक ठिकाणांहून मराठा शब्द वगळावा लागेल हे शासनाने समजून घ्यावे.
एकीकडे शासनाला हा सल्ला देताना त्यांनी शासन मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची घोषणा करीत असताना आंदोलन करण्याची गरज नसल्याचा अप्रत्यक्ष टोला भुजबळ यांना लगावला. हे आंदोलन म्हणजे सगळ्याच पक्षांसाठी पक्षवाढीची रंगीत तालीम आहे. जरांगे याला अपवाद आहेत. त्यातुन कुणाला काय मिळेल ते माहित नाही, परंतू नेत्यांची झोळी मात्र रिकामी राहणार नाही, असेही ते म्हणाले. उपोषणावर झालेल्या लाठीहल्ल्याचाही त्यांनी समाचार घेतला.
सरकारने कांद्याबाबत चुकीचा निर्णय घेतला आहे. कांद्यावर निर्यात बंदी केली आणि आता तुम्ही कांदे देत आहात मग आम्ही आमच्याच थोबाडीत मारून घ्यायची का? कांदा विदेशात जाऊ द्यायचा नाही आणि पंतप्रधान म्हणतात अच्छे दिन आयेंगे, अशी टिका करीत प्रसंगी कांदा आंदोलनात सहभागी होण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले.