नाशिक : पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी याचा विचार करून होळी लहान स्वरूपात करा तसेच होळीला पोळी देत असताना ती अल्पप्रमाणात देऊन गरजवंतांसाठीदेखील पोळ्या बाजूला ठेवा तसेच आपल्या सोयीनुसार रस्त्यावरील भुकेलेल्यांना द्या, असे आवाहन महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सण-उत्सव साजरे करताना ते कालमानानुरूप बदलले पाहिजे. गुरुवारी (दि. १) सर्वत्र होलिकोत्सव साजरा केला जात असताना हे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वीस वर्षांपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविला जात आहे. होळी लहान करण्याचे आवाहन करण्यामागे पर्यावरणाचा विचार आहे. वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या घटत आहे. त्यामुळे कमीत कमी लाकडे लागतील अशा पद्धतीने होळी छोट्या स्वरूपात केली पाहिजे, असा संदेश महाराष्टÑ अंनिस देत असते, तर पोळीचे दान करण्याचे आवाहन करण्यामागे सामाजिक बांधिलकीचा विचार आहे. होळीमध्ये नैवेद्य म्हणून पोळी अर्पण केली जाते. संपूर्ण पोळी देण्याऐवजी एक अल्पसा भाग देऊन उर्वरित पोळी जर भुकेलेल्या वर्गाला दिली तर होळीत राख होण्याऐवजी पोळी गरजूची भूक भागवू शकेल. अन्न हे पूर्णब्रह्म आहे, त्याचा सन्मान करावा, अशी अंनिसची भूमिका आहे. याशिवाय होळीच्या दुसºया दिवशी होत असलेल्या धुळवडीच्या दिवशी रासायनिक रंग वापरणे टाळा तसेच नैसर्गिक रंगांचा वापर करावा तसेच धुळवडीच्या दिवशी रंग आणि पाण्याचे फुगे फेकणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.महाराष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वीस वर्षांपासून असे आवाहन केले जाते. काही भागात अंनिसचे कार्यकर्ते परिसरातील नागरिकांना आवाहन करून पोळ्यांचे दान स्वीकारून गरजवंतांपर्यंत पोहोचवत असतात.- महेंद्र दातरंगे, जिल्हा कार्यवाह, महाराष्टÑ अंनिस
होळी करा लहान, पोळी करा दान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:44 AM