नाशिक : लढाऊ हेलिकॉप्टरचा वैमानिक हा भारतीय सैन्य दलाचा महत्त्वाचा घटक आहे. सैन्यातील वैमानिकाचे भवितव्य उज्ज्वल व आव्हानात्मक आहे, याचे भान ठेवून धाडस व कौशल्याची सांगड घालावी आणि राष्ट्राभिमानास्पद कामगिरीने करावी, असे प्रतिपादन महू येथील सैन्य प्रशिक्षण शाळेचे कमान्डंट लेफ्टनंट जनरल के. एच. सिंग यांनी केले.गांधीनगर येथील क ॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅटस्) २४ व्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी सिंग मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. चित्ता, चेतक, धु्रव या लढाऊ हेलिकॉप्टरांच्या साक्षीने व चित्तथराक युद्ध प्रात्यक्षिकांनी रंगलेला आर्मी एव्हिएशनचा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. लष्करी बॅन्ड पथकाच्या तालावर ३२ प्रशिक्षणार्थी जवानांच्या तुकडीने ‘आर्मी परेड’ सादर करत उपस्थित लष्करी अधिकारी वर्गाला मानवंंदना दिली. सिंग यांच्या हस्ते वैमानिकांना ‘एव्हिएशन विंग’ व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सिंग म्हणाले, धाडस व कौशल्याच्या जोरावर यशस्वीपणे उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक नेहमीच महान ठरतो. राष्ट्राची सेवा करण्यासाठी ‘एव्हिएशन’हे अत्यंत उत्कृष्ट असे व्यासपीठ असून, त्याचा पुरेपूर फायदा करून घेत देशसेवेसाठी सदैव प्रयत्नशील रहावे. मला खात्री आहे की ‘कॅटस्’चा प्रत्येक वैमानिक हा सैन्य दलाच्या अपेक्षा पूर्ण करणारा ठरेल. यावेळी कर्नल किरण गोडे, ब्रिगेडियर अजयकुमार सुरी, लेफ्टनंट कर्नल मनीष वाही आदि मान्यवर उपस्थित होते. लष्करी अधिकाऱ्यांसह त्यांचे व प्रशिक्षणार्थी जवानांच्या कुटुंबीयांमधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी कॅमेऱ्यात सोहळ्याच्या छबी टिपत ऐतिहासिक क्षण साठवून ठेवले. (प्रतिनिधी)
राष्ट्राभिमानास्पद कामगिरी घडावी
By admin | Published: November 14, 2015 11:23 PM