नाशिक : शहराचा विकास करण्यासाठी आगामी २५ वर्षांतील नियोजन करून विकास आराखडा तयार करा, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि.१६) शिवसेनेच्या नगरसेवकांना दिला.
महापालिकेतील सर्व शिवसेना नगरसेवकांची शनिवारी ‘वर्षा’ या निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हा शब्द दिला. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, दत्ता गायकवाड, सुनील बागुल, वसंत गिते, विनायक पांडे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
नाशिकच्या विकासाला पोषक ठरणाऱ्या नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी विजय करंजकर यांनी नाशिक जिल्ह्यातील तर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शहरातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला.
विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महानगरपालिकेतील कामकाजाची माहिती दिली. आभार गटनेता विलास शिंदे यांनी मानले.
याप्रवीण तिदमे, सूर्यकांत लवटे, डी. जी. सूर्यवंशी, भागवत आरोटे, सुदाम डेमसे, केशव पोरजे, संतोष गायकवाड, प्रशांत दिवे, सत्यभामा गाडेकर, सुवर्णा मटाले, कल्पनाताई पांडे, हर्षाताई बडगुजर, मंगलाताई आढाव, पूनमताई मोगरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
इन्फो..
भाजपविषयी तक्रारी
गेल्या चार वर्षांपासून नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे, नगरसेवकांची विकासकामे होत नसल्याची वारंवार तक्रार होते, परिणामी नाशिक शहराचा विकास हा खुंटला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी नाशिकच्या विकासाकामांसंदर्भात सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते व विलास शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
छायाचित्र आर फोटोवर १६ शिवसेना