नाशिक : सामनगाव परिसरात मुक्त संचार करणारा बिबट्या (नर) रविवारी मध्यरात्री अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मागील चार दिवसांपासून सामनगाव परिसरात बिबट्याचा वावर नागरिकांना दिसून येत होता. यामुळे वनविभागाने या भागात पिंजरा तैनात केला होता. भक्ष्याच्या शोधात भटकंतीला निघालेला बिबट्या रात्री पिंजऱ्यात अडकला.सामनगाव येथील विरोबा मंदिर परिसरातील ढोकणे वस्ती येथे बिबटयाने वासरू ठार केल्याची घटना घडली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी सामनगाव तंत्रनिकेतन जवळील रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात तीन बिबट्यांनी दर्शन दिले होते. सामनगाव परिसरात बिबट्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने सुभाष जगताप यांच्या शेतात पिंजरा लावला होता. रात्री उशिरा सावजाच्या शोधात असलेला बिबट्या या पिंजऱ्यात अडकला. माहिती मिळताच वनपाल अनिल अहिरराव, दक्षता पथकाचे वनपाल मधुकर गोसावी, प्रेमराज जगताप, गोविंद पंढरे, नाना जगताप, वन्यजीव रेस्क्यु वाहनचालक प्रवीण राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेत बिबट्या अडकलेला पिंजरा ताब्यात घेत सुरक्षित ठिकाणी हलविला. हा नर बिबट्या एक वर्षे वयाचा असल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. लोकांच्या मागणीनुसार या भागात पुन्हा पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनपाल अनिल अहिरराव यांनी सांगितले.-------